बांगलादेशात जे घडलं खर्या अर्थाने बिघडलं, त्यामुळे जगभरातील हिंदूंना आणखी सजग आणि एकत्र येण्याची संधी मिळाली. वस्तुतः तेथील हिंदूंच्या रक्षणासाठी केंद्रातील सरकार सक्षम आहे आणि जातीने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र, आपल्या राज्यात आणि देशात अशा घटनांचा अभ्यास नसताना आणि कॅमेर्यासमोर येऊन बोलायचे असते, म्हणून काहीतरी बोलणार्यांची संख्या अधिक वाढली आहे. त्यामुळे अशा बोलघेवड्या लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. विशेषतः भावी पिढीने तर याला बळी पडता कामा नये; अन्यथा जसे चुकीचा इतिहास आजतागायत माथी मारून अनेक पिढ्यांची दिशाभूल केली, तसेच हे खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरविण्याचे आलेले पेव आपल्या भावी पिढ्यांसाठी धोक्याचे भोंगे बनता कामा नये. बांगलादेशात निर्माण झालेली स्थिती ही काही एका रात्रीतून निर्माण झाली नाही, त्यामागे षड्यंत्र असल्याचे जाणकार सांगतात, हे आधी समजून घेतले पाहिजे. आपल्या देशातील काही बोलबच्चन लोक जो काही दुष्प्रचार याबाबत करीत आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. भारतातही असे घडू शकते, असे जे सांगत सुटले आहेत, ते चक्क आपल्या हिंदू बांधवांचा तेथे अतोनात छळ करत आहेत, याकडे दुर्लक्ष तर करीतच आहेत. मात्र, त्याचे एकप्रकारे समर्थनच करीत आहेत आणि हेच अतिशय धोकादायक आहे. हे असे बारकाईने समजावून सांगण्याचे प्रयोजन असे की, अगदी भविष्यात धोका बनू पाहणार्या काही घडामोडी आपल्या देशात नव्हे तर पुण्यातदेखील होत असतात आणि त्याला नाहक येथील निरपराध हिंदू बळी पडत असतो. ‘इसिस’चे मॉड्यूल असो, की ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’च्या घटना असो, यात आपल्याच लोकांचे नुकसान होत आहे. जशी बांगलादेशातील आपल्या हिंदू बांधवांचे रक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे, तशीच जबाबदारी येथील आपल्याच निरपराध हिंदू बांधवांवर होणार्या अत्याचाराचा मुकाबला करण्याचीदेखील आहे. त्यामुळे यामागे असणार्या शक्तींशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे आवश्यकच आहे, म्हणूनच बांगलादेशातील घटनेने यातून शिकण्याची आपल्या सर्वांना संधी दिली आहे.
बळकटीकरण
बाप्पांच्या आगमनासाठी आता प्रत्येक गणेशभक्त सज्ज झाला आहे. आगामी काळात या उत्सवाच्या निमित्ताने समाजाला एकत्र येण्याची संधी उपलब्ध होणार आहे. लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची ही संकल्पनाच मुळी या एकत्र राहण्यासाठी तसेच भारतीय संस्कृती अबाधित राहणे आणि तिचा प्रसार होणे, यासाठी मांडली होती. पुण्यातील गणेशोत्सव हा आता जागतिक पातळीवर ख्यातकीर्त. पण, काही विघ्नसंतोषी मंडळी यात सक्रिय झाले आहेत. वैचारिकतेच्या नावाखालीदेखील अनेकजण या उत्सवात नको ते मुद्दे आणून बदनामी करण्याचा प्रयत्न करीत असतात, त्यामुळे जो चांगला उद्देश असतो, तो बाजूला राहतो आणि नको त्या गोष्टींवर मंथन केले जाते. गेल्या काही वर्षांत पुण्यातील गणेशोत्सवाला अशा तर्हेेने ग्रहण लावण्याचे उद्योग काही विघ्नसंतोषी करीत असतात. दुर्दैवाने, आपले काही लोकही त्याला नाहक बळी पडतात आणि या कारस्थानात सहभागी होतात. गणेशोत्सवातील काही खटकणार्या गोष्टींवर नाही म्हणायला अनेकदा काथ्याकूट केला जातो. काही लोक जाणूनबुजून त्याला बदनाम करण्यासाठी काही गोष्टी पेरत असतात, तर काही उतावीळ लोक भारतीय संस्कृती सोडून विदेशी संस्कृतीचा अतिरेक करीत उत्सवाला गालबोट लावायचादेखील प्रयत्न करतात. मात्र, आता प्राप्त परिस्थितीत तर या सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व आणि एकीकरणाचा उद्देश साध्य करणे भाग पडले आहे. कोणत्याही विद्रुपीकरणाला थारा न देता हा आणि आगामी काळात येणारे सर्व हिंदूंचे उत्सव उत्साहात आणि आनंदात साजरे करावे, हे या निमित्ताने अधोरेखित करावे लागेल. कारण, ज्या काही हिंदूंविरोधात घटना-घडामोडी अलीकडील काळात घडत आहेत आणि त्याबाबतचे गैरसमज पसरवून इतरांचे लांगूलचालन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी समाज म्हणून आपली सजग राहण्याची जबाबदारी निभावण्याची ही संधी आहे. या एकीतून समोरच्याला धडकी भरेल आणि दुष्कृत्य करण्याची हिंमत होणार नाही, असा पवित्रा घेण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक उत्सवातून ते शक्य आहे, वैचारिक प्रबोधनासोबतच बळकटीकरण आणि खोटे ‘नॅरेटिव्ह’ पसरविणार्यांचा चातुर्याने पाणउतारा करणे, या गोष्टी सहज साध्य होणार आहेत.
अतुल तांदळीकर