मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Crisis) बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे सत्र सुरू असताना काहीजण यास राजकीयदृष्ट्या प्रेरित हिंसा असल्याचा दावा करत आहेत. 'बांगलादेशात इस्लामवाद्यांकडून होत असलेला हिंसाचार हिंदूंविरुद्धच्या द्वेषामुळे नव्हे तर राजकीय कारणांसाठी केला जात आहे.', असे 'ह्युमन राइट्स वॉच'च्या आशिया उपसंचालक मीनाक्षी गांगुली यांनी म्हटले आहे.
हे वाचलंत का? : वंशविच्छेदामुळे बांगलादेशात हिंदू लोकसंख्येत घट
आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवर लिहीत त्या म्हणाल्या की, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या भीषण हल्ल्यात संगीतकार राहुल आनंदा यांचे घर जाळण्यात आले. कारण त्यांनी शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला पाठिंबा दिला होता. अधिकाऱ्यांनी कायद्याचे राज्य सुनिश्चित केले पाहिजे आणि गुन्हेगारांना ओळखले पाहिजे आणि त्यांच्यावर खटला चालवला पाहिजे.
वास्तविक हिंदूंच्या द्वेषामुळे हिंदूंवर, त्यांच्या मंदिरांवर आणि मालमत्तेवर इस्लामवाद्यांकडून हल्ले होत नसल्याचा दावा करणाऱ्या गांगुली या एकट्या नाहीत. तर शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या पाठिंब्याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला जात असल्याचे अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले होते. तथापि, वाचकांकडून जोरदार टीका झाल्यानंतर वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची हेडलाइन बदलली. या वृत्तात म्हटले आहे की बांगलादेशातील हिंदूंना लक्ष्य केले जात आहे कारण ते शेख हसीना यांच्या राजकीय पक्ष अवामी लीगचे समर्थन करतात. जातीय कारणांसाठी त्यांच्यावर हल्ले होत आहेत असे नाही.