भिवंडीत सकल हिंदू समाजाचा विराट मोर्चा

    08-Aug-2024
Total Views |

Hindu Morcha
 
मुंबई : तीन दिवसांपूर्वी भिवंडीतील गायत्री नगर येथे राहणार्‍या कैकाडी समाजाच्या भगिनी रेणुका माने यांना वेलकम हॉटेलचा मालक रऊफ खान आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली. त्या महिलेला वाचविण्यासाठी गेलेल्या विकास यादव आणि उमेश पाटील या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. भिवंडीतील हजारो हिंदू नागरिकांनी बुधवार, दि. 7 ऑगस्ट रोजी मोर्चा काढत घटनेचा निषेध व्यक्त केला.
 
शासन आणि प्रशासनाने अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी, तसेच रेणुका माने कुटुंबाला तातडीने पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी पू. चिदानंदजी सरस्वती महाराज, महंत शिवरूपानंद महाराज आणि विहिंपचे प्रदेशमंत्री मोहन सालेकर यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार, रेणुका माने यांची मुलगी दि. 3 ऑगस्ट रोजी वेलकम हॉटेलमध्ये फ्राईड राईसची ऑर्डर देण्यासाठी गेली असता हॉटेल मालक रऊफ शेख यांनी मुलीशी अश्लील बोलणे केले.
 
तिने घरी जाऊन तिच्या आईला म्हणजेच रेणुका माने यांना घडलेला सविस्तर प्रकार सांगितला. याबाबत हॉटेल मालकाला जाब विचारला असता त्याने चिडून रऊफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी अत्यंत घाणेरड्या शिव्या घातल्या आणि हॉटेलचे शटर बंद करून रेणुका यांस मारहाण सुरू केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्याच वस्तीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते विकास यादव आणि उमेश पाटील तिच्या मदतीला धावून गेले, तर त्या दोघांवरही धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. दोघांच्याही डोक्यावर हातापायांवर खोल जखमा झाल्या आहेत आणि ते सध्या उपचार घेत आहेत.
 
पू. चिदानंदजी सरस्वती मोर्चाला संबोधित करताना म्हणाले, आज हिंदू समाजावरील हल्ले वाढत आहेत. मुली व महिला लव जिहादच्या शिकार होत आहेत, अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्‍या शासनाने याबाबत कठोर भूमिका घेत जिहाद्यांना जेरबंद करावे, त्यांच्या घरांवर, आस्थापनांवर बुलडोझर फिरवावा आणि आपल्या लाडक्या बहिणींना सुरक्षा पुरवावी.विश्व
 
हिंदू परिषदेचे प्रदेशमंत्री मोहन सालेकर, बजरंग दलाचे प्रांत संयोजक गौतम रावरीया, पीडित भगिनी रेणुका माने यांनीही आपल्या भाषणात कट्टरतावाद्यांवर जोरदार प्रहार केले. शेवटी महंत शिवरूपानंद यांनी हिंदू समाजाला आपापल्या वस्त्यांमध्ये हिंदू शक्ती केंद्रे उभी करण्याचे आवाहन केले. या मोर्चात भाजपचे आमदार महेश चौगुले, एडवोकेट मनोज रायचा, मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण मंच आदी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.