राज्यसभेच्या दोन जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान

    07-Aug-2024
Total Views |
rajyasabha election


मुंबई :      राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. खासदार छत्रपती उदययनराजे भोसले यांचा कार्यकाळ दि. ५ एप्रिल २०२६ आणि पीयूष गोयल यांचा कार्यकाल दि. ४ जुलै २०२८ असा आहे. तथापि, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दोघेही विजयी झाल्याने राज्यसभेचा पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

या पोटनिवडणुकीची अधिसूचना बुधवार, दि. १४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. २१ ऑगस्ट, दि. २२ ऑगस्टला अर्जांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २६ ऑगस्ट असून, मंगळवार दि. ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. या पोटनिवडणुकीची मतमोजणी त्याच दिवशी म्हणजे ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून सुरू होईल. ही संपूर्ण प्रक्रिया शुक्रवार दि. ६ सप्टेंबर रोजी पूर्ण होईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.