छत्रपती संभाजीनगर : ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्रे रद्द करा, अशा आशयाचे बॅनर वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा सुरु केली असून ते राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर ७ ऑगस्ट रोजी आरक्षण बचाव यात्रेची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर वंचितकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. यातील एका बॅनरवर ५५ लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच सर्वत्र ओबीसी समाजाचे १०० आमदार निवडून आणणार, अशा आशयाचेही बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, याठिकाणी मंडल विजय दिवसही साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याशिवाय "एससी एसटी यांच्यासाठी ५४ आरक्षित जागांवर आम्ही ओबीसी समूह आरक्षणवाद्यांनाच मत देणार! सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्यांना मदत करणार नाही. हो आम्ही ५४ आरक्षित जागांवर आरक्षणवाद्यांनाच मत देणार," अशा आशयाचेही बॅनर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.