धाराशिव : राज ठाकरे माझी भेट घेणार ही त्यांची पळवाट होती. ते कधीही मला भेटायला येणार नाहीत, अशी टीका मनोज जरांगेंनी केली आहे. राज ठाकरेंनी आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली होती. यावर त्यांनी आपण मनोज जरांगेंची भेट घेणार असल्याचे आश्वासन दिले होते.
याबद्दल बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "रोजगाराचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही. ही शब्दांची स्टंटबाजी आहे. हे शब्दांचे खेळ त्यांनीच खेळावेत. त्यांच्याइतके शब्दांचे खेळ दुसऱ्यांना खेळता येणार नाहीत. राज ठाकरे लपवाछपवी करणाऱ्यांच्याही पुढचे आहेत. ते माझी भेट घेणार ही त्यांची पळवाट आहे. ते मला भेटायला येणार नाही, फोनही करणार नाहीत."
"मराठ्यांच्या मुलांनी राज ठाकरेंना जाब विचारल्यामुळे ती त्यांची पळवाट होती. आम्ही याबाबत खूप सावध आहोत. आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत येऊ द्यायचा नाही. आरक्षण म्हणजे काय हे श्रीमंतांना कधीच कळणार नाही आणि आम्हाला त्यांच्या भेटीचीही अपेक्षा नाही," असेही मनोज जरांगे म्हणाले.