दर स्थिर ठेवणारा रशियन तेलपुरवठा

    05-Aug-2024
Total Views |
russian oil supply


जुलै महिन्यात भारताने रशियाकडून विक्रमी 2.09 दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी तेलआयात केली. भारताने पारंपरिक तेलपुरवठादार देशांना म्हणजेच आखाती देशांना मागे सारत, रशिया भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार देश म्हणून आता पुढे आला आहे. मध्य- पूर्वेतील अशांत परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या विषयाचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित व्हावे.

जुलैमध्ये रशियाकडून भारताने विक्रमी तेलआयात केली आणि एका वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी जुलैमध्ये एकूण 2.09 दशलक्ष बॅरल प्रतिदिन (बीपीडी) रशियन कच्च्या तेलाची आयात केली, जी मागील वर्षीच्या जूननंतरची सर्वोच्च ठरली. त्यामुळे भारताच्या तेलआयातीतील रशियाचा वाटा जवळपास 43 टक्के इतका झाला आहे. इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या पारंपरिक तेलपुरवठादार देशांच्या एकत्रित आयातीएवढा झाला आहे. भारताच्या तेलबाजारात रशियाचे वर्चस्व निर्माण होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. युक्रेनने रशियाच्या तेलप्रकल्पांवर ड्रोनने हल्ला करण्याचे धोरण अवलंबलेले दिसून येते. त्यामुळे रशियाने मुबलक प्रमाणात निर्यातीला चालना दिली. त्याचा पूर्ण फायदा भारताने घेतला. त्याचबरोबर, पारंपरिक आखाती देशांच्या तुलनेत रशिया सवलतीच्या दरात तेलपुरवठा करत असल्यामुळे, भारताने रशियन तेलाला प्राधान्य दिलेले दिसून येते. मात्र, रशियाने सौदी अरेबियासमोर आव्हान उभे केलेले दिसून येते. रियाधमधून गेल्या दशकातील सर्वात नीचांकी आयात नोंद झाली. भारताच्या आयातीत सौदीचा वाटा 13.7 टक्के इतकाच राहिला. भारत आणि रशियादरम्यान आयात का वाढत आहे, याची कारणमीमांसा करणे, म्हणूनच महत्त्वाचे ठरते.

मध्य-पूर्वेतील वाढता तणाव जगभरात नव्याने अस्थिरता निर्माण करणारा ठरला असताना, रशियाने भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार देश म्हणून ओळख प्रस्थापित करणे, हे भारत-रशिया मैत्रीच्या नव्या पर्वाचे द्योतक ठरावे. विशेषतः युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा करत, राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेतली, तेव्हा जगभरातील विश्लेषकांचे लक्ष या भेटीकडे लागले होते. भारतासोबतच्या मैत्रीला चालना देण्यासाठी मोदी-पुतीन भेटीत अनेक नवेनवे ठराव करण्यात आले. अनेक दशकांपासून सुरू असलेले भारत-रशिया मैत्रीचे पर्व यापुढेही कायम राहणार, असेच यातून अधोरेखित झाले.

गेल्या वर्षी जून महिन्यात रशियन तेलाची आयात सर्वात जास्त नोंदवली गेली होती. तथापि, जुलैमध्ये ती 2.08 बीपीडी इतकी विक्रमी झाली. मात्र, या वाढलेल्या आयातीचा थेट फटका सौदीला बसतो आहे. भारताने आपल्या तेलपुरवठादार देशांमध्ये वैविध्य राखण्यावर नेहमीच भर दिला आहे. एका देशावर आयातीसाठी अवलंबून न राहता, त्यासाठी वेगवेगळे पर्याय भारताने सातत्याने शोधले आहेत. रशिया-युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर, जेव्हा पाश्चिमात्य राष्ट्रांसह ‘नाटो’, ‘जी-7’ समूहाने रशियावर आर्थिक निर्बंध लादत, त्याची आर्थिक कोंडी केली, तेव्हा रशियाने सवलतीच्या दरात तेलखरेदीचा पर्याय भारताला दिला. भारतानेही मिळालेल्या संधीचा फायदा घेत, रशियन तेलाची आयात वाढवली. संपूर्ण युरोप खंड जेव्हा महागड्या ऊर्जा संकटाचा सामना करत होते, तेव्हा भारतात ऊर्जेच्या किमती स्थिर राहिल्या. यासाठी रशियाला धन्यवाद हे दिलेच पाहिजेत. तेव्हाही भारताने रशियाकडून तेलखरेदी का केली, अशी विचारणा जेव्हा पाश्चात्य देशांनी केली, तेव्हा ऊर्जासंकट नियंत्रणात ठेवण्याचा भारताला अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले गेले. याच देशांनी त्यानंतरच्या कालावधीत भारतातून शुद्ध पेट्रोल आणि डिझेलची आयात केली. भारत हा पहिल्यांदाच शुद्ध ऊर्जेचा मोठा पुरवठादार देश म्हणून पुढे आला. भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी सवलतीच्या दरात रशियाकडून तेलखरेदी केली आणि बाजारभावाने त्याची युरोपीय देशांना विक्री केली.

युरोपीय देश प्रामुख्याने तेलासाठी रशियावरच अवलंबून होते. पाश्चात्य देश, तसेच ‘जी-7’ समूहाने जे निर्बंध लादले, त्याचा थेट फटका युरोपलाच बसला. त्यांना बाजारातून महागड्या दराने ऊर्जा खरेदी करावी लागली. परिणामी, तेथे महागाई भडकली आणि मंदीचे सावट तीव्र झाले. भारतातही रशिया-युक्रेन युद्धाला जेव्हा तोंड फुटले, तेव्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकल्या होत्या. तथापि, गेली दोन वर्षांपेक्षा जास्त काळ देशांतर्गत बाजारपेठेत इंधनाच्या किमती स्थिर राखण्यात भारताला यश मिळाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मध्य-पूर्वेत जेव्हा इस्रायल-हमास रक्तरंजित संघर्ष सुरू झाला, तेव्हाही जगभरात इंधनाच्या किमती पुन्हा वाढणार, अशीच भीती व्यक्त होत होती. मात्र, रशियाने या किमती नियंत्रणात ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली. अमेरिकेनेही म्हणूनच भारताच्या रशियाकडून वाढत जाणार्‍या तेलआयातीवर आक्षेप घेतला नाही. किंबहुना, मध्यंतरी अमेरिकेने भारत-रशिया दरम्यानच्या तेलव्यापाराने जगभरात इंधनाच्या किमती मर्यादित राहिल्या, हे मान्य केले.

रशिया भारताला सवलतीच्या दरात तेलपुरवठा तर करतेच, त्याशिवाय तो स्थानिक चलनामध्ये होतो. ‘स्विफ्ट’ या आंतरराष्ट्रीय पेमेंट प्रणालीतून रशियाची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर, रशियाने भारत आणि चीन या दोन देशांशी आयात-निर्यात वाढवली आहे. त्यासाठी स्थानिक चलनांचा मुख्यत्वे वापर केला जातो. रशियाकडे जो रुपया शिल्लक राहतो, त्यातून रशिया भारताकडून आयात करते. त्यासाठीच रशियाने भारताबरोबरचे व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला आहे. रशियाची आर्थिक कोंडी करण्यासाठी म्हणून त्यावर लादलेले निर्बंध प्रत्यक्षात पाश्चात्य राष्ट्रांचेच आर्थिक नुकसान करणारे ठरले. त्याचा सर्वात मोठा फटका युरोपला बसला. त्याचवेळी भारताने मिळालेल्या संधीचे सोने केले, असेच म्हणता येईल. सौदीकडून अथवा आखाती देशांमधून भारत जी तेलाची आयात करत होता, त्याची देयके अमेरिकी डॉलरमध्ये चुकती केली जात होती. आज 43 टक्के आयात रशियाकडून रुपयात होत आहे. ही आयात म्हणूनच रुपयाला बळकट करणारी ठरली आहे.

इस्रायल-इराण संघर्षामुळे इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला, तर अमेरिकेसह विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था आता कुठे मंदीतून सावरत असताना, पुन्हा एकदा मंदीकडे जातील. त्याचा जगाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. रशियन तेलामुळे भारतात इंधनाचे दर स्थिर आहेत, हे नाकारता येणार नाही.

संजीव ओक