आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड; अमेरिकेत मंदीची शक्यता?
05-Aug-2024
Total Views | 47
मुंबई : जागतिक स्तरावरील आर्थिक स्थितीत असलेली अस्थिरतेचा परिणाम जगातील प्रमुख शेअर बाजारावर दिसून आला आहे. अमेरिकेत मंदीची शक्यता आणि त्यानंतर देशातील दोन शेअर बाजार निर्देशांकांत प्रचंड घसरण झाली असून याचा परिणाम गुंतवणूकदारांना जाणवू लागला आहे. जागतिक बाजारातील समभागांमध्ये झालेल्या नुकसानीचा नकारात्मक परिणाम राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज(बीएसई)चा निर्देशांक सेन्सेक्स २२०० अंकांनी घसरून ७८७८१.३७ वर स्थिरावला असून राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई)चा निर्देशांक निफ्टी ५० सुध्दा ६५३.४० अंकांनी घसरून २४,०६४.३० वर स्थिरावला आहे. बाजारात पहिल्या सत्रातील पडझड दुपारच्या सत्रात देखील सुरूच राहिली. परिणामी, मार्केट बंद होताना दोन्ही निर्देशांक नीच्चांकी पातळीवर आल्याचे चित्र दिसून आले.
बीएसईमधील प्रमुख ३० कंपन्यांमध्ये (सेन्सेक्स ३०) मध्ये टाटा मोटर्स सर्वाधिक ७ टक्क्यांनी घसरले त्यानंतर टाटा स्टील, मारुती, अदानी पोर्ट्स, एसबीआय आणि जेएसडब्ल्यू स्टील यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे. मार्केट समीकरणारनुसार जागतिक स्तरावर प्रमुख बाजारांनी नीचांकी पातळी दर्शविली असून मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०४ टक्क्यांच्या आसपास घसरला आहे.
बाजारात नीचांकी घट झाल्यानंतर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टाटा स्टील, माझगाव डॉक, टायटन यांसारख्या अनेक कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती कमी झाल्या आहेत. अमेरिकेतील वाढती महागाई आणि घटते रोजगार या पार्श्वभूमीवर देशात मंदीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचाच नकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला आहे.