ढाका : बांग्लादेशात आरक्षणाविरोधात हिंसाचार उफाळून आल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर सेना प्रमुख जनरल वकार-उज-जमान यांनी प्रसिद्धी माध्यमांना ही माहिती दिली आहे. शेख हसीना यांच्यानंतर आता लष्करानेच सत्तेची सुत्रं सांभाळत अंतरिम सरकार स्थापन करणार असल्याची माहिती दिली.
या संदर्भात त्यांनी देशातील सर्वच राजकीय पक्षांसह बैठक घेतली. १८ सदस्यांच्या मदतीने अंतरिम सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. सेना प्रमुख जनरल वकार-उज-जमान यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ज्या हत्या झाल्या त्यांना न्याय मिळेल.
ते म्हणाले की, “पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. आपल्या देशाचे नुकसान होत आहे. मला जबाबदारी द्या, मी सांभाळू शकेन. सेना प्रमुख म्हणाले की, "आम्ही आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य करू, देशात आम्हाला शांतता हवी आहे. मारपीट, नुकसान करण्यापासून लोकांना थांबवले पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत हात मिळवून चाललात तरच परिस्थिती सुधारेल. हिंसाचार करून कुणाला काहीच मिळणार नाही. तुम्हाला शांततेच्या व चर्चेच्या मार्गानेच न्याय मिळणार आहे.
बांग्लादेशमध्ये होत असलेल्या हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी देश सोडला. हेलिकॉप्टर मार्गे त्या सुरुवातीला भारतात त्रिपुरा येथे दाखल झाल्या. तिथून त्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीहून त्या लंडनला जाणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. देश सोडण्यापूर्वी त्यांना एक भाषण रेकॉर्ड करायचे होते. मात्र, अराजकता इतकी वाढली होती की, त्यांना यासाठी वेळच मिळालेला नाही. इस्लामी कट्टरपंथी झुंड त्यांच्या घराकडे कूच करत होती. याच भितीने त्यांना देश सोडावा लागला. त्यांनी भारताच्या पूर्वेकडील आगरतळा या ठिकाणी आश्रय घेतला होता. त्यानंतर त्या दिल्लीमार्गे लंडनला जाणार असल्याची चर्चा आहे.
आरक्षणाच्या नावावर सुरू झालेल्या हिंसाचारात एकूण चार लाखांहून अधिक लोक रस्त्यांवर उतरले आहेत. त्यात एकूण तिनशे लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. तसेच जखमींची संख्या हजारांच्या वर आहे. रविवारी इस्लामी कट्टरपंथींनी भडकविलेल्या हिंसाचारात १३ पोलीसांना झुंडीने मारले. आत्तापर्यंत १० दशलक्ष डॉलरपर्यंत अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले आहे. शेख हसीनांच्या राजीनाम्यापूर्वी संपूर्ण देशभरात कर्फ्यू लागला होता. ज्यावेळी अंतरिम सरकार स्थापन झाले त्यावेळी हिंसाचार बंदी उठवण्यात आली आहे. सेनाप्रमुखांनी ही बंदी उठवली आहे.