राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त प.म.राऊत यांचे निधन

    05-Aug-2024
Total Views |
 
प. म राऊत  
 
मुंबई: विद्या विकास एज्युकेशन सोसायटी व स्वामी शामानंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व संचालक श्री. प.म. राऊत यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वार्ध्यक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्राथमिक शाळेतून ज्ञानदानाचे काम सुरु करून १९६२ साली पंतनगर, घाटकोपर येथे विद्या विकास एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून शैक्षणिक कार्यास सुरुवात केली.
 
विक्रोळी, घाटकोपर, वांगणी व रेडी तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग येथे त्यांनी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय सुरु करून या संस्थेचा वटवृक्ष वाढविला. आजमितीस सुमारे दहा हजार विद्यार्थी या संस्थेंतर्गत शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. भारत सरकारने १९९४ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव केला .
 
कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून विकास रात्र शाळा व ज्यु.कॉलेज व विकास रात्र महाविद्यालय सुरु केले. शिक्षक व शैक्षणिक संस्थांच्या विविध समस्या, वेतन, वेतनेत्तर अनुदान, शिक्षक संचमान्यता, कायम विनानुदानित शाळांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा फी प्रश्न या व अश्या विविध समस्या संघटना पातळीवर शासनाकडे मांडण्यासाठी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणून त्यांनी विशेष कार्य केले. भंडारी समाज मंडळ, मुंबई या सामाजिक संस्थेचे ते आधारस्तंभ होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.