वैसे तो इक आसूं ही
बहाकर मुझे ले जाये
ऐसे कोई तुफान हिला
वसीम बरेलींचा हा शेर पॅरिस ऑलिम्पिकमधील रोलँड गॅरोसमध्ये अक्षरशः जगलो. टाय ब्रेकवर सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या कार्लोस अल्कराझविरुद्ध विजयी गुण वसूल केला आणि लाल मातीवर अश्रुंचा महापूर आला. एरव्ही कणखर वाटणारा 37 वर्षीय जोकोव्हिच लहान मुलासारखा ढसाढसा रडला. जिंकणारा जोकोव्हिच रडला अन् हरणारा कार्लोसही रडला आणि या दोघांचे अश्रू पाहून रोलँड गारोसवर उपस्थित प्रत्येक टेनिसप्रेमींच्या डोळ्यांत अश्रू दाटले. या अश्रूंत विजय-पराजयाचा भेदभाव नव्हता... होता तो एका ऐतिहासिक क्षणाचा हुंकार...
ऑलिम्पिकच्या इतिहासात पुरुष एकेरीचे सुवर्ण पदक जिंकणारा जोकोव्हिच सर्वाधिक वयस्क खेळाडू ठरलाय. त्याने सर्वात कमी वयात ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणार्या स्पेनच्या कार्लोसचा 6-7, 6-7 असा पराभव केला. टेनिस ग्रॅण्डस्लॅमचे अवघे जग जिंकणार्या जोकोव्हिचकडे नव्हते, ते फक्त ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक. या पदकासाठी त्याने जंग जंग पछाडले होते. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये जोकोव्हिचला ऑलिम्पिकच्या कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते. स्पेनच्या राफेल नदालने उपांत्य फेरीमध्ये जोकोव्हिचचा पराभव केला होता आणि नंतर चिलीच्या फर्नांडो गोन्झालोझला पराभूत करीत सुवर्ण पदक जिंकले होते. आज एक वर्तुळ पूर्ण झाले. नदालचा वसा सांगणार्या स्पेनच्याच कार्लोसचा पराभव करीत जोकोव्हिचने अखेर ऑलिम्पिकचे सुवर्ण पदक जिंकले.
जोकोव्हिचची अवस्था त्या कवितेतील सम्राटासारखी होती. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. 24 ग्रॅण्डस्लॅम जिंकूनही ऑलिम्पक सुवर्ण पदकने त्याला आजवर हुलकावणी दिली होती. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्येही स्पेनच्याच पाब्लो बुस्टाने त्याला कांस्य पदकाच्या मॅचमध्ये पराभूत केले होते. एकूणच जोकोव्हिचला ऑलिम्पिक पदकाला स्पेनच्या खेळाडूंचा नेहमीच अडथळा राहिला होता आणि यंदा तर साक्षात स्पेनचा सुपरस्टार 21 वर्षीय कार्लोसशी जोकोव्हिचचा अंतिम फेरीमध्ये मुकाबला होता. कार्लोसने अवघ्या 21 दिवसांपूर्वी याच जोकोव्हिचला पराभूत करीत विम्ब्लडनचे विजेतेपद मिळवले होते. विम्बल्डनच्या अंतिम फेरीचा ‘रिमेक’ म्हणून या पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीकडे पाहिले जात होते. कार्लोस तुफान फॉर्ममध्ये होता. टेनिसमधील अनुभवविरुद्ध सळसळते तारुण्य, असा तुफानी मुकाबला होता. अनुभवाने तारुण्यावर मात केली, असे मी म्हणणार नाही, तर त्या तारुण्याला दीपस्तंभासारखा पुढील वाटचालीसाठी जोकोव्हिचने आदर्श घालून दिला. पॅरिसमधील रोलँड गारोसवरील तांबड्या मातीवर जोकोव्हिचने ढाळलेल्या प्रत्येक अश्रूतून टेनिसमधील नव्या कळ्या फुलतील आणि बहरतील...
संदीप चव्हाण