महाराष्ट्र शासनाने ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या टोयोटो कंपनीला 20 हजार कोटींच्या गुंतवणुकीला मान्यता देत, कंपनीबरोबर सामंजस्य करारदेखील केला आहे. मोठी गुंतवणूक शहरात आली की, शहराचा चेहराच बदलून जातो. या गुंतवणुकीमुळे साहजिकच मराठवाड्याचादेखील कायापालट होणार आहे, त्याचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीसाठी टोयोटोने 20 हजार कोटींची गुंतवणूक करणारा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाबरोबर केला. मराठवाड्यासाठी ही चालून आलेली एक सुवर्णसंधी आहे. टोयोटो ही जपानमधील गाड्यांची अग्रगण्य उत्पादक कंपनी असून, ती गाड्यांच्या निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. याच टोयोटो कंपनीने भारतात किर्लोस्कर समूहाबरोबर जवळपास 1995-96 च्या आसपास भागीदारी केली. किर्लोस्कर समूह हा देखील भारतातील उत्पादन क्षेत्रात एक अग्रगण्य समूह आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांच्या वतीने महाराष्ट्रात जी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे, त्याचा सर्वच क्षेत्रात मोठा परिणाम होताना आपल्याला दिसणार आहे. हा परिणाम जसा मराठवाड्याला होईल, तसाच तो निश्चितच राज्याच्या सकल उत्पादनवाढीमध्येदेखील दिसणार आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाढ एक ट्रिलियनपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे, त्यात अर्धी वाटचाल निश्चितच या गुंतवणुकीमुळे सोप्पी होणार आहे.
इकोसिस्टीम विकास हा देखील त्यांचा महत्त्वाचा पैलू आहे. मियाकी या संकल्पनेवर आधारित लहान जागेमध्ये अतिशय घनदाट जंगलाची निर्मिती केली जाते. यासाठी वृक्षांच्या स्थानिक जातींची लागवडदेखील केली जाते. कर्नाटकात 450 एकरांचा असाच प्रकल्प टोयोटोने उभारला आहे. त्यात अनेक वनस्पती, प्राणी, पक्षी आपल्याला मुक्तसंचार करताना दिसतात. स्थानिक पर्यावरणासाठी सकारात्मक आणि शाश्वत विकास करण्याच्यादृष्टीने टोयोटोचा प्रयत्न असलेला दिसतो आहे. त्यामु़ळे महाराष्ट्रातही असाच प्रकल्प येणार असल्याने, निश्चितच त्याचा सकारात्मक परिणाम सर्वच क्षेत्रांवर आपल्याला पाहिला मिळेल.
अजून दुसरी मोठी बाब म्हणजे, कर्नाटक मधला टोयोटो कंपनीचा प्रकल्प हा 450 एकरमध्ये विस्तारलेला आहे. तर महाराष्ट्रात होणार्या प्रकल्पाचा विस्तार हा जवळपास 900 एकरमध्ये असणार आहे. टोयोटो कंपनीचा हा जगातील दुसर्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प ठरणार आहे. कर्नाटकात असलेल्या प्रकल्पात त्यांनी तीन प्लांट सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी कर्नाटकमधील 31 आयटीआय केंद्रे दत्तक घेतली आहेत. जेव्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु होईल तेव्हा महाराष्ट्रातीलही आयटीआय केंद्रे दत्तक घेतील, तेव्हा कौशल्य विकास या क्षेत्रात होणारी राज्याची प्रगती लक्षणीय असेल. तसेच टोयोटो ही कंपनी त्याच्या तंत्र प्रशिक्षण संस्थेमध्ये एक हजार मुले आणि एक हजार मुलींना दहावीच्या शिक्षणाच्या आधारावर प्रशिक्षित करत असतात. यामध्ये त्यांच्यातील कौशल्य विकासाबरोबर व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील सुनिश्चित केला जातो. यातील निम्म्यापेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींना टोयोटोमध्येच नोकरीदेखील मिळते, तर काही जण अन्य ठिकाणी नोकरी करू शकतात. यामुळे निश्चितच कौशल्य विकासाचा प्रसार होण्यास सहकार्य होणार आहे. टोयोटो ही कंपनी त्यांच्या सिस्टीम आणि मूल्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गोष्टी जेव्हा सहजपणे आपल्याकडील युवकांच्या अंगवळणी पडतील, त्याचा राज्याला होणारा लाभ हा फार मोठा असणार आहे. तसेच त्यामुळे लोकांच्या जीवनात नैतिकता वाढेल,नियमांच्या पालनाचे महत्वही समजेल. म्हणजे जसा राज्याच्या अर्थव्यवस्थेला या गुंतवणुकीचा फायदा होणार आहे, तसेच समाजावरही याचे सकारात्मक आणि दूरगामी परिणाम पाहायला मिळतील.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दिलेली ही एक अमूल्य भेटच आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणला तसाच टोयोटोच्या रुपाने समृद्धीदेखील आणली. यामुळे मराठवाड्याची जनता सदैव फडणवीस यांची ऋणी असेल हे निश्चित. हा निर्णय घेताना निश्चितच अनेक अडचणी आल्या, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यालयातील अधिकारी यांनी अतिशय बारकाईने प्रत्येक समस्येचा विचार करून हे कार्य पूर्ण केले आहे. आम्ही फक्त दाखवण्याचे काम केले, मात्र त्याला दिशा देऊन प्रत्यक्षात आमचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या अधिकार्यांचेच आहे.
टोयोटो महाराष्ट्रात थेट गुंतवणूक ही 20 हजार कोटींची करणार आहे, या गुंतवणुकीतून 6 ते 7 हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील, असे म्हटले जात असले, तरी माझ्या अंदाजाने निश्चितच त्यापेक्षाही अधिक रोजगार निर्माण होतील. जेव्हा एखादा प्रकल्प उभा राहतो, तेव्हा त्याला पूरक असे अनेक लहानमोठी व्यवसाय असणारी बाजारपेठदेखील उभी राहत असते. या नव्याने उभ्या राहिलेल्या बाजारपेठेतूनच अनेक अप्रत्यक्ष रोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होत असतात. जेव्हा अशा प्रकल्पातून रोजगार मिळू लागले की, स्थानिकांच्या हातात पैसा येतो आणि त्यातूनच माणसाच्या नव्या गरजांची पूर्तता करण्यासाठी शाळा, दळणवळणाच्या आधुनिक सुविधा, घर, बाजारपेठ, मनोरंजनासाठी चित्रपटगृहे, नाट्यगृहे ,क्रीडासंकुले अशी एक साखळीच त्यातूनच निर्माण होते. हीच अर्थव्यवस्थादेखील नव्या स्थानिक रोजगाराची निर्मिती करत असते. म्हणजेच या प्रकल्पातून 20 हजार कोटी जरी थेट गुंतवणूक असली, तरी अप्रत्यक्ष गुंतवणूक ही 27 ते 30 हजार कोटींच्या घरात जाईल हे निश्चित. यातूनच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार हे 10 ते 12 हजार निर्माण होतील. जेव्हा एका माणसाला रोजगार मिळतो, तेव्हा अंदाजे चार माणसांचा उदरनिर्वाह त्यावर भागतो, असे ढोबळमानाने गणित असते. या हिशेबाने किमान 50 हजारांच्या आसपास लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याची क्षमता या एका प्रकल्पात आहे.
जेव्हा एखाद्या कंपनीची गुंतवणूक 20-25 हजार कोटींच्या घरात असते, तेव्हा बाजारात या गुंतवणुकीमुळे होणारी उलाढालही अंदाजे मूळ गुंतवणुकीच्या पाचपट होत असते. या हिशेबाने टोयोटोमुळे छत्रपती संभाजीनगर भाागात वर्षाकाठी एक लाख कोटींच्या आसपास उलाढाल होणार असेल, तर मराठवाड्यामध्ये याचे चित्र किती सकारात्मक असेल ते पाहणे नक्कीच आनंददायी असणार आहे. त्यामुळे निश्चितच हा मराठवाड्यासाठी गेमचेंजर होणार असून, बजाज कंपनीनंतर मराठवाड्यासाठी ही मोठी संधी मिळाली आहे. एकेकाळी जलद वेगाने विकसित होणारे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख होती, तीच ओळख मिळवण्याच्या दिशेने आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरची वाटचाल सुरू झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या व्यवहारांतून सरकारला मिळणारे उत्पन्नदेखील नक्कीच सुखावणारे असेल आणि त्याचा राज्याच्या तिजोरीला फायदाच होईल.
मराठवाड्यात दरवर्षी 30 हजारच्या आसपास विद्यार्थी पदवी संपादन करत, पण इकडे आवश्यक रोजगारनिर्मिती झाली नसल्याने, अनेक विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागत असल्याचे आम्ही टोयोटोला सांगितले. त्यामुळे तिकडे त्यांना वाहतुकीपासून अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. मात्र, छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र तसे नाही, इकडे अर्ध्या तासात एका जागेवरून दुसरीकडे सहज जाता येते. तसेच माणूस जेव्हा कुटुंबासमवेत राहतो, तेव्हा त्याची काम करण्याची क्षमतादेखील नैसर्गिकरित्या वाढते. तसेच तो फावल्या वेळेत शेती किंवा इतर काही पूरक व्यवसायदेखील सहज करू शकतो. याचा फायदा निश्चितच त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर होतो.
टोयोटो ही कंपनी अतिशय चिकित्सक आहे. ते अतिशय बारकाईने तपासूनच सर्वांचा निर्णय घेतात. छत्रपती संभाजीनगरमधील गुंतवणुकीचा निर्णय घेतलादेखील. त्यांनी 10 ते 11 महिने घेतले. त्यामुळे जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटोसारखी कंपनी गुंतवणूक करते, तेव्हा साहजिकच हे शहर गुंतवणुकीसाठी आदर्श असल्याचा संदेश जगभरातील गुंतवणूकदारांपर्यंत जात असतो. त्यामुळे भविष्यात अधिक गुंतवणूक मराठवाड्यात आल्याने, सरकारला अधिक भूमी अधिग्रहण करावे लागण्याचीदेखील शक्यता आहे. आम्हाला मार्गदर्शन करणारे रवि माछर साहेब, राम भोगले साहेब तसेच चेंबर्स ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरची यांनी यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच या संपूर्ण प्रकल्पात माझ्यासमवेत नितीन गुप्ता, अरप्रित सावे, उत्सव माचर, अथर्वेशराज नंदावत यांनीही प्रचंड मेहनत घेतली. मराठवाड्याच्या जनतेसाठी काही करणे शक्य झाले याचा आनंद आहे, त्यामुळे मराठवाड्याची येणारी पिढी निश्चितच आम्हांला आनंदाने आशीर्वाद देतील, याची खात्री आहे.
दुष्यंत पाटील
(लेखक चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकचरचे माजी अध्यक्ष आहेत.)