ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण सध्या ऑलिम्पिकनिमित्त फ्रान्स दौर्यावर आहेत. ‘मिशन ऑलिम्पिक’मधून या क्रीडामेळ्यातील घडामोडीही ते दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या माध्यमातून तमाम वाचकांपर्यंत पोहोचवित असतात. या दौर्यातून थोडी उसंत मिळताच संदीप चव्हाण यांनी लुव्र राजवाड्यातील फ्रान्सची राष्ट्रीय लायब्ररी गाठली. त्यांच्या या लायब्ररीच्या भेटीचे हे शब्दचित्रण...
’Todays reader tommorow's leader’ हे अठराव्या शतकातील अमेरिकेची पहिली महिला युद्ध पत्रकार मार्गारेट फुल्लरचे वाक्य फ्रान्सच्या राष्ट्रीय लायब्ररीत पुस्तक चाळताना दृष्टीस पडले. खरंच, ‘वाचाल तर लीडर व्हाल’ याची साक्ष पटवण्यासाठी तुम्ही एकदा तरी पॅरिसच्या या ‘बीएनएफ’ अर्थात फ्रान्सच्या राष्ट्रीय लायब्ररीत आलंच पाहिजे. खेळापासून जागतिक, राजकीय आणि सांस्कृतिक कलेचे भान देणारी लाखो पुस्तके येथे तुमचे स्वागत करायला सज्ज आहेत.
ऑलिम्पिकच्या धावपळीत थोडीशी उसंत मिळाली म्हणून फ्रान्सच्या राष्ट्रीय लायब्ररीत डोकावण्याचे ठरवले. लुव्र म्युझियमला लगटून असलेल्या लुव्र राजवाड्यात ही फ्रान्सची आलिशान अशी राष्ट्रीय लायब्ररी उभी आहे. 1368 मध्ये चार्ल्स पाचवा याने ही खासगी लायब्ररी उभारली, जी पुढे 1692 मध्ये जनतेसाठी खुली करण्यात आली. लक्षात घ्या, पॅरिसमध्ये जेव्हा लायब्ररी उभारली जात होती, त्याच्या 100 वर्षे आधी ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रात भगवद्गीतेवर भाष्य करणारी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली होती. पण, जगाला पसायदान देणारे महाराष्ट्रातील हे शब्दांचे धन जगापर्यंत पोहोचवण्यात आपण कमी पडलो, हेच खरे... भारतात बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी ग्रंथालयाची मुहूर्तमेढ रोवली. युरोप आणि अमेरिका दौर्यात पाहिलेल्या लायब्ररींचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. भारतात परतल्यावर त्यांनी 1910 साली अमेरिकन ग्रंथपाल डब्ल्यू. ए. बोर्डेन यांनी ‘बडोदा लायब्ररी’ निर्माण करण्यासाठी निमंत्रित केले होते.
एकट्या पॅरिसमध्ये आजमितीस सुसज्ज अशा 57 लायब्ररी आहेत आणि त्याही पूर्णतः मोफत. मी फ्रान्सच्या या राष्ट्रीय लायब्ररीत पाऊल ठेवले तेच मुळी दबकत. लायब्ररीचा भव्यपणा अंगावर येतो. लायब्ररी दर्दी वाचकांनी फुलून गेलेली. या लायब्ररीला भेट देणार्या वाचकांमध्ये सर्वाधिक 122 वयाच्या वृद्धाने भेट दिल्याची नोंद आहे. जगभरातील 12 भाषांचे साहित्य येथे उपलब्ध आहे. 35 लाखांहून अधिक पुस्तके येथे आपली प्रतीक्षा करीत आहेत. जगभरातील 80 हजारांहून अधिक दुर्मीळ हस्तलिखिते या ग्रंथालयात आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे निकोलस मनुचिने काढलेले दुर्मीळ ओरिजिनल छायाचित्रही आहे. सुवर्णजडित महाराजांचे हे छायाचित्र पाहण्यासाठी तरी एकदा या ग्रंथालयाला भेट दिलीच पाहिजे. ‘उद्याचे लीडर’ होण्यासाठी ‘आज रीडर’ व्हायलाच हवे.
या लायब्ररीत रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांची पुस्तके फ्रेंच भाषेत उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरांपासून ते वीर सावरकरांपर्यंतचे साहित्य फ्रेंच भाषेत येथे जगभरातील वाचकांना उपलब्ध करून दिले पाहिजे, असे सहज मनाला वाटून गेले. लायब्ररीतून फेरफटका मारताना अमेरिकन ‘पापाराजी’ फोटोग्राफीचा जनक मानल्या जाणार्या रॉन गॅलेल्लाचे ‘बॉक्सिंग वुईथ द स्टार’ हे पुस्तक हाती पडले. फोटोग्राफीतील जादू पाहायची असेल, तर हे पुस्तक एकदा वाचलेच पाहिजे. त्यातील जगज्जेता बॉक्सर मोहम्मद अलींच्या एका वाक्याने माझ्या काळजाचा ठाव घेतला. अली म्हणतात, ‘आपल्याकडे जे आहे, त्याची किंमत आपण ते जोवर गमावत नाही तोवर कळत नाही...’
खरचं आपल्याला अजून तरी आपल्या वैभवशाली इतिहासाची किंमत कळलीय का?
संदीप चव्हाण