नीट प्रश्नपत्रिकाफुट केवळ दोन शहरांपुरतीच मर्यादित : सर्वोच्च न्यायालय
एनटीए आणि केंद्र सरकारने व्यवस्थेत सुधारणा करण्याची सूचना
03-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट रोजी वैद्यकीय पदवी प्रवेशपरीक्षाप्रकरणी (नीट युजी) प्रकरणी सविस्तर निकाल दिला. प्रश्नपत्रिकाफुटीचे प्रकरण हे मोठ्या प्रमाणावर झाले नसून हा सर्व व्यवस्थेतील बिघाड नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. सरन्यायाधीश न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडिवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ‘नीट युजी’प्रकरणी आपला विस्तृत निकाल दिला.
खंडपीठाने म्हटले की,“नीट युजी’ परीक्षेत कोणतेही व्यवस्थागत उल्लंघन नाही. ही प्रश्नपत्रिकाफुट फक्त पाटणा आणि हजारीबाग या दोन शहरांपुरती मर्यादित होती. केंद्राने स्थापन केलेली समिती परीक्षा प्रणालीच्या सायबर सुरक्षेतील संभाव्य भेद्यता, छाननी वाढविण्याची प्रक्रिया, परीक्षा केंद्रांच्या सीसीटीव्ही पाळत ठेवण्यासाठी तांत्रिक प्रगती यासाठी एसओपी तयार करण्याचा विचार करेल.”
सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आपल्या निकालात त्यांनी एनटीएच्या संरचनात्मक प्रक्रियेतील सर्व त्रुटी उघड केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी आम्ही असे होऊ देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर्षी जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते पुन्हा होऊ नये, यासाठी ते केंद्राने दुरुस्त करावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
एनटीएला दिले हे निर्देश
एनटीएला परीक्षा आयोजित करण्याची पद्धत बदलावी.
एजन्सीने प्रश्नपत्रिका सेट झाल्यापासून परीक्षा संपेपर्यंत काटेकोरपणे छाननी केली पाहिजे.
प्रश्नपत्रिका तपासण्यासाठी एसओपी बनवावी.
कागदपत्रांची वाहतूक करण्यासाठी खुल्या ई-रिक्षांऐवजी रिअल टाईम लॉक असलेली बंद वाहने वापरावीत.
इलेक्ट्रॉनिक फिंगरप्रिंट्स आणि सायबर सिक्युरिटी रेकॉर्डिंगची व्यवस्था करा, जेणेकरून डेटा सुरक्षित ठेवता येईल.