ठाण्यात संततधार पावसाने अडवली वाहनांची वाट

सायंकाळपर्यत पाऊस ८० मि. मीटर

    03-Aug-2024
Total Views | 52

Thane
 
ठाणे : ठाणे शहरात गेले काही दिवस लपंडाव खेळणाऱ्या पर्जन्यराजाने शुक्रवारी रात्रीपासुन संततधार धरली. मात्र, मध्ये मध्ये विराम घेत धुवाँधार बरसणाऱ्या पावसाने सखल भाग वगळता कुठेही पाणी तुंबण्याच्या घटना झाल्या नसल्या तरी घोडबंदर रोड तसेच मुंबई - नाशिक महामार्गावर वाहनांची वाट अडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शुक्रवार सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३० पर्यंत ५० मि.मीटर पावसाची नोंद झाली.तर शनिवारी दिवसभरात सायंकाळी साडेपाच पर्यंत सुमारे ८० मि.मीटर पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती ठाणे महापालिका आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली.
 
हवामान विभागाने शनिवार ०३ व रविवार ०४ ऑगस्ट रोजी ठाण्यासाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठाण्यात १ जून ते ०३ ऑगस्ट या कालावधीत एकुण २३६० मि.मीटर पाऊस बरसला आहे. २०२३ साली याच कालावधीपर्यंत २४४४ मि.मीटर पाऊस पडला होता. जुलै महिन्यात पावसाची दमदार बॅटिंग झाली होती. गेले काही दिवस उसंत घेतलेल्या पावसाचा लपंडाव सुरू होता.तर, शुक्रवारी रात्रीपासुन पावसाने पुन्हा जोर पकडला असुन शनिवारचा विकेण्ड पावसाने चांगलाच गाजवला.
 
शनिवारी शहरात दमादमाने धुवॉधार बरसणाऱ्या पावसाने विशेष पडझडीच्या घटना घडल्या नसल्या तरी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा बायपासवर पावसामुळे नियंत्रण सुटलेला अवजड ट्रक रस्ता सोडुन थेट रस्ता दुभाजकामधील मोकळ्या जागेत घुसल्याची दुर्घटना घडली. तर,धर्मवीरनगरमध्ये टीएमटीचा बस थांबा कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने दोन्ही घटनामध्ये कुणीही जखमी झाला नाही.दरम्यान, पावसामुळे ठाणेकरांचा विकेण्ड घरातच गेला. विशेष कुठेही पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या नाहीत. तरीही घोडबंदर रोड तसेच मुंबई - नाशिक महामार्गावर पावसामुळे वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी झाली होती.
 
 वसई फाट्याला ट्रकमधील हायड्रोजन गॅसच्या टाक्या पेटल्या
 शनिवारी दुपारच्या सुमारास डी मार्टच्या पुढे वसई फाट्याजवळ मुंबई-गुजरात वाहिनीच्या दुभाजकामध्ये नियंत्रण सुटलेला ट्रक उलटला. या गाडीत हायड्रोजन गॅसच्या टाक्या असल्याने त्या खाली रोडवर आपटल्याने टाक्यांनी पेट घेतला. या आगीमुळे अनर्थ टाळण्यासाठी मुंबई व गुजरात वाहिनीवरील सर्व वाहतूक सुरक्षित अंतरावर थांबवण्यात आली होती. परिणामी,घोडबंदर रोड मार्गे जाणारी अवजड वाहतुक देखील थांबवण्यात आल्याने ठाण्यात वाहतुकीचा बोजवारा उडाला.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121