जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे- गुलाब वझे

जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे- गुलाब वझे

    03-Aug-2024
Total Views |

aagri yuth forum
डोंबिवली : आगरी समाजाला पूर्वी जी वागणूक मिळत होती त्याबद्दल दुःख होत असे. त्यातुनच काहीतरी प्रगती करण्यासाठी समाज शैक्षणिक दृष्टया प्रगत झाला पाहिजे यासाठी आमचा अट्टाहास होता. तो आमचा उद्देश सफल झाला. आता समाज शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाला असून, डॉक्टर, वकील, इंजिनिअर असे मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात समाजातील मुले मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात आगरी समाजातील युवक मानाने समाजाचे नाव मोठे करीत आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार आगरी युथ फोरम डोंबिवलीचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी काढले.
आगरी युथ फोरम,डोंबिवली यांच्या विद्यमाने सन २०२३ व २०२४ शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता १० वी उत्तीर्ण पदवी,पदविका धारण केलेल्या शिवाय प्रावीण्य मिळवलेल्या आगरी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच सत्कार समारंभ नुकताच होरायझन सभागृह येथे पार पडला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आचार्य प्रल्हाद महाराज शास्त्री, सद्गुरू सावळाराम महाराज यांचे नातू चेतन महाराज म्हात्रे, जगन्नाथ महाराज म्हात्रे, बाळकृष्ण महाराज पाटील, जयेश महाराज भाग्यवंत, जनार्दन महाराज पाटील, प्रकाश महाराज म्हात्रे, गणेश महाराज ठाकूर, अनंता महाराज पाटील, बबन महाराज म्हात्रे आदि वारकरी पंथ समाजातील संत मंडळी उपस्थित होती.
वझे म्हणाले, आगरी समाजातील हे यशस्वी विद्यार्थी देशासाठी रत्ने आहेत. संत सावळाराम महाराज यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. समाजाला एकत्र आणण्याचे काम आगरी युथ फोरम करीत आहे. आगरी युथ फोरम, डोंबिवली या संस्थेची वाटचाल सुमारे ३४ वर्षेपासून अगदी खडतर प्रवासातुन झाली असतानाच सामाजिक सेवेतील सेवा देताना कुठेच कमतरता जाणवली नाही. आजही विविध प्रकारचे कार्यक्रम तितक्याच जोमाने होत असतात. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. पण आजच्या कार्यक्रमातील आनंद मोठा आहे कारण एक गरीब कुटुंबातील योगेश सी.ए. झाला हे समाजासाठी अभिमानाचे आहे. असे ही ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष विश्वनाथ रसाळ, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, चिटणीस प्रकाश भंडारी, खजिनदार पांडुरंग म्हात्रे, कार्यकारी सदस्य शरद पाटील, गुरुनाथ म्हात्रे, संतोष संते, जयेंद्र पाटील, सदस्य सदानंद म्हात्रे, भानुदास भोईर, कांता पाटील, विनायक पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पाटील, अशोक पाटील, प्रवीण पाटील, आगरी महोत्सव संयोजक समिती, ग्लोबल कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स आदींनी विशेष मेहनत घेतली. या सोहळ्यास विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.