'त्या'वेळी कुठे होतात? बदलापूर प्रकरणात रुपाली चाकणकरांनी टोचले विरोधकांचे कान!

    22-Aug-2024
Total Views |
 
Rupali Chakankar
 
मुंबई : उरण, कोपरखैरने आणि वसईमध्ये घडलेल्या घटनेवेळी कुठे होतात? असा खरमरीत सवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधकांना केला आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणात त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. तसेच यामध्ये राजकारण न करण्याचा सल्लाही दिला.
 
माध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, "बदलापूरची घटना अतिशय संतापजनक असून राज्य महिला आयोगाने या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. यामधील आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच ज्या कंत्राटदारांनी असे कर्मचारी पुरवले तसेच संस्थाचालक आणि शाळा समितीवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे अशा घटना घडू नये, यासाठी सखी सावित्री आणि शिक्षक पालक संघटनेची पाहणी युद्धपातळीवर होणार आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत नेण्यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल," असे त्यांनी सांगितले.
 
हे वाचलंत का? -  ब्रेकिंग! MPSC ची तारीख पुढे ढकलली
 
त्या पुढे म्हणाल्या की, "बदलापूरच्या घटनेनंतर आंदोलन करणाऱ्यांमध्ये पालक कमी आणि बाहेरून आलेली लोकं जास्त होती. ही घटना संतापजनक आहे. पण जेव्हापासून लाडकी बहिण योजना सुरु झाली तेव्हापासून अशा आंदोलनाच्या माध्यमातून लोकं स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. विरोधकांनी यात राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची घटना नाही. यापूर्वी उरण, कोपरखैरने आणि वसईमध्ये घडलेल्या घटनेवेळी विरोधक कुठेही दिसले नाही. कारण यातील आरोपी त्यांच्या सोयीचे नव्हते. परंतू, आता ते ज्याप्रकारे टीका करून समाजात उद्रेक निर्माण करत आहेत, ते चुकीचं आहे. हे राजकारणाचं ठिकाण नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूकीच्या वेळी राजकारण करावं. अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई करणे अपेक्षित होते. परंतू, ज्या पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करण्यात विलंब केल्या त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे," असे त्या म्हणाल्या.
 
"पश्चिम बंगालच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणतात की, अशा घटना घडत असतात. पण महाराष्ट्रात अशी घटना घडली असताना त्या सातत्याने वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सोशल मीडियाचे लोक लाडकी बहिण योजना बंद करा, महाराष्ट्र बंद करा असे मेसेज करतात. ही योजना गोरगरिब महिलांसाठी आहे. त्या योजनेचा या घटनेशी काहीही संबंध नाही. तरीसुद्धा यावरून त्यांचा उद्रेक होत आहे. त्यामुळे असं राजकारण करून त्यांनी स्वत:ची पोळी भाजू नये. यावरून जर महाराष्ट्र पेटला तर त्याला सर्वस्वी विरोधक जबाबदार असतील," असेही त्या म्हणाल्या.