रत्नागिरीत उद्योग व पर्यटनाला चालना मिळणार; भूमिपूजनात मुख्यमंत्र्यांकडून विशेष आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन

    21-Aug-2024
Total Views |
 ratnagiri airport terminal bhoomipujan cm shinde


रत्नागिरी :       उद्योग, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे असून हेलिकॉप्टर सेवा, टुरिस्ट सर्कीट तयार केल्यास मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. जिल्ह्यातील विमानतळ टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडल्यानंतर नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे हात तयार करा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

दरम्यान, विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचा गणेशा झाला, नवं दालन तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जगाला टक्कर देणारे इथले पर्यटन आहे. त्यासाठी कनेक्टीव्हीटी खूप महत्वाची आहे. नाईट लँडीगची सुविधा केल्यास परदेशी पर्यटक वाढण्यास मदत होणार आहे. पूर्ण क्षमतेने विमानतळ चालले पाहिजे, उद्योगासाठी पायाभूत सुविधा आणि वातावरण चांगले आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

दावोसमध्ये ५ लाख कोटीचे सामंजस्य करार केले होते. त्यापैकी ७० टक्के अमंलबजावणी स्तरावर आहेत. उद्योग क्षेत्रात भरभराट होत असून जिल्ह्यात पर्यटनातूनही विकासाची मोठी संधी आहे. मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत असून विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तसेच, दोन महिन्यापूर्वी विमानतळाबाबत बैठक आयोजित केल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी टर्मिनल इमारतीसाठी १०० कोटी रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला, असे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, रविंद्र फाटक, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, सिंधुरत्न समृध्द योजनेचे विशेष निमंत्रित सदस्य किरण सामंत, मिरजोळे सरपंच रत्नदिप पाटील, शिरगाव सरपंच फरिदा काझी आदी उपस्थित होते.