मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार गाजत आहे. पहिल्या दिवसांपासूनच घरातील सदस्य एकमेकांवर आगपाखड करत आहेत. परंतू, घरातील काही सदस्य मर्यादा ओलांडून घरातील वयाने आणि अभिनय क्षेत्रातील कामगिरीच्या बाबतीतही ज्येष्ठ कलाकारांवर टीका करत आहेत. नुकताच घरात 'सत्याचा पंचनामा' हा टास्क झाला. या टास्कमध्ये सदस्यांनी प्रत्येकाच्या मताला असहमती दिल्याने त्यांना कोणतीही बीबी करन्सी मिळवता आली नाही. टास्क झाल्यानंतर जान्हवी किल्लेकर चांगलीच भडकलेली दिसली. तिने अभिनेते पंढरीनाथ कांबळे यांच्या अभिनयावरुन टीका केली असून सदस्यांसोबत नेटकरी देखील जान्हवीवर चांगलेच नाराज झालेले दिसले.
जान्हवी टास्क झाल्यावर मोठ्या आवाजात पंढरीनाथ कांबळेंना उद्देशून म्हणाली, "पॅडीदादाच्या काहीतरी अंगात घुसलंय. आयुष्यभर ओव्हरअॅक्टिंग करुन करुन दमले. आता तीच ओव्हरअॅक्टिंग घरात दाखवत आहेत." पॅडीने हे ऐकलं. ते आतमध्ये बसले होते. तिचं बोलणं ऐकूण कांबळे म्हणाले की, "ती आपल्या अॅक्टिंगबद्दल वगैरे बोलते. तिला बाहेर आल्यावर इतकं भोवेल ते. तिला खूप त्रास होईल. एका इंडस्ट्रीत आहोत कधी ना कधीतरी क्लॅश होणार. मला आशा आहे की तिला कळेल की पॅडी कांबळे असेल तर मी काम नाही करणार. मी देवाकडे याविषयी प्रार्थना करतो."
दरम्यान, जान्हवीच्या या विधानावरुन आर्याने तिला खडेबोल सुनावले. ती जान्हवीला म्हणाली, "तू आता पॅडीदादाच्या अभिनयाबद्दल काय बोलली पुन्हा रिपीट कर. जेवढी अॅक्टिंग तू नसेल केली ना तेवढी अॅक्टिंग त्यांनी याआधी केलीय. त्यांनी इतकी वर्ष थिएटर केलंय, काम केलंय. तुझ्यासारखं नाहीय. उगाच कोणाच्या करिअरवर जाऊ नको. इथे आधीच खूप घाण करतेय. करिअरबद्दल घाण ऐकून घेणार नाही. " आर्या बोलत असताना जान्हवी कान साफ करत होती. हे जेव्हा पॅडीला कळलं तेव्हा तो आर्याला घेऊन जायला आला. जान्हवीच्या या कृतीचा नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून तिच्याविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. जान्हवीने काहीच दिवसांपूर्वी वर्षा उसगांवकर यांना मिळालेल्या राज्य पुरस्कारांबद्दलही त्यांच्यावर टीका केली होती.