रा. स्व. संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक केरळमध्ये

पलक्कड येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान होणार बैठक

    20-Aug-2024
Total Views |
rss meeting akhil bhartiya kerala

 
नवी दिल्ली :      राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (रा. स्व. संघ ) अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा केरळमधील पलक्कड येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी ही माहिती दिली आहे. रा. स्व. संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदाच घेतली जाते.

गेल्या वर्षी सप्टेंबर २०२३ मध्ये पुणे येथे ही बैठक झाली होती. या अखिल भारतीय समन्वय बैठकीत विविध संघप्रणित संघटनांमध्ये काम करणाऱ्या संघटनांचे प्रमुख सहभागी होतात. या सर्व संस्था सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रात सकारात्मक कार्यात लोकशाही पद्धतीने सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात सक्रिय आहेत.

बैठकीत विविध संघटनांचे कार्यकर्ते आपल्या कामाची माहिती व अनुभव यांची देवाणघेवाण करतील. राष्ट्रीय हिताच्या विविध विषयांच्या संदर्भात सध्याची परिस्थिती, अलीकडील महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक बदलाच्या इतर आयामांवरील योजनांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विषयांवर परस्पर सहकार्य आणि समन्वय वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही सर्व संघटना चर्चा करतील.

समन्वय बैठकीत सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, संघाचे सहाही सह सरकार्यवाह व इतर प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. या बैठकीत राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पार्टी, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ यासह विविध ३२ संघ प्रेरित संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, संघटना मंत्री आणि प्रमुख अधिकारी राहणार आहेत.