विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीकडे कल; बाजारात २१ हजार कोटी रुपयांचा व्यवहार!
18-Aug-2024
Total Views |
मुंबई : भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचे सत्र सुरू ठेवले आहे. ऑगस्ट महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल २१,१०१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत. या मागचे कारण येन चलनात कमी व्याजदराने देशाकडून कर्ज घेणे आणि दुसऱ्या देशाच्या मालमत्तेत गुंतवणूक न करणे तसेच, अमेरिकेतील मंदीची भीती, जागतिक पातळीवर वाढता तणाव यांसारख्या कारणांमुळे शेअर्स विक्रीकडे गुंतवणूकदारांचा कल आहे.
विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात ३२,३६५ कोटी रुपयांचे शेअर्स तर जून महिन्यात २६,५६५ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले होते. विशेष म्हणजे परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जून-जुलै या दोन महिन्यांत सातत्यपूर्ण आर्थिक वाढ, सतत सुधारणा, कंपन्यांचे अपेक्षित तिमाही निकाल आणि राजकीय पातळीवर स्थिरता या आशेने गुंतवणूक केल्याचे पाहायला मिळाले आहे. एफपीआयने इक्विटी शेअर्समध्ये १४,३६४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
याआधीच लोकसभा निवडणुकीदरम्यान विदेशी गुंतवणूकदारांनी मे महिन्यात २५,५८६ कोटी रुपये काढले होते. त्याचबरोरबर, मॉरिशससोबत देशाच्या कर करारातील बदल आणि यूएस बाँड उत्पन्नात सातत्याने वाढ होत असल्याच्या चिंतेमुळे एप्रिलमध्ये ८,७०० कोटींहून अधिक रक्कम काढली होती. त्यानंतर आता आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांनी ऑगस्ट महिन्यात (१-१७ ऑगस्ट)दरम्यान आतापर्यंत शेअर बाजारातून २१,२०१ कोटी रुपयांचे भांडवल काढले आहे.