नवी दिल्ली, दि. १७ : आरजी कार वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार – हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घ्यावी, अशी विनंती करणारी पत्रयाचिका सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना लिहिण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ‘सुओ मोटो’ दखल घ्यावी, अशी विनंती करणारे पत्र उज्ज्वल गौड आणि रोहित पांडे यांनी लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, हा खटला केवळ एका निष्पापाच्या जीवावर बेतलेला नाही तर हा देशाच्या आत्म्यावरील हल्ला आहे. देशाच्या महान संविधानाने मानलेल्या न्याय आणि मानवतेच्या आदर्शांचा घोर अपमान आहे. ज्या क्रूर रीतीने या तरुणीचे जीवन संपवले गेले, त्यामुळे आपल्या देशाच्या सामूहिक विवेकाला धक्का बसला आहे. ज्या आवारात त्याने मानवतेची सेवा केली होती, त्याच आवारात त्याच्यावर निर्घृण अत्याचार आणि हत्या करण्यात आली, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा; अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि निर्घृण हत्येप्रकरणी डॉ. मोनिका सिंह यांनीदेखील सरन्यायाधीशांन पत्र लिहिले आहे. त्या सिकंदराबाद येथील सैन्य दंत महाविद्यालयातील कर्मचारी आहेत. डॉक्टरांच्या वतीने पत्र याचिका दाखल करणारे वकील सत्यम सिंह म्हणाले की, सरन्यायाधीशांना पाठवलेल्या पत्र याचिकेत कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयात केंद्रीय सशस्त्र दल तैनात करण्याची विनंती केली आहे. जेणेकरुन आंदोलक डॉक्टर आणि गुन्हे स्थळाचे संरक्षण करता येईल. ज्या प्रकारे लोकांना धमकावले जात आहे आणि पुराव्यांशी छेडछाड केली जात आहे, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून स्वत:हून दखल घ्यावी, असे पत्रात लिहिले आहे.