मुंबई : 'सामना'मध्ये वाट्टेल ते लिहून शाई वाया घालवू नका, असा खोचक टोला भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना लगावला आहे. शनिवार, १७ ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात 'दिवाळखोर सरकार' अशा शीर्षकाचा अग्रलेख छापून आला. यावर भाजपने जोरदार टीका केली.
यावरून केशव उपाध्येंनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतला. केशव उपाध्ये म्हणाले की, "तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेसाठी गेला होता त्यांनी वर्षानुवर्ष या राज्यावर कर्जाचा डोंगर चढवला आहे. एकदा १५०० रुपयांत राज्य विकता म्हणायचं, एकदा १५०० रुपयांनी काय होणा आहे असं म्हणायचं, एकदा आमचं सरकार आलं की, १५०० रुपयांमध्ये भर घालून वाढवू म्हणायचं आणि दुसरीकडं १५०० रुपये परत घेण्याच्या खोट्या बातम्या करायच्या. हा तुमचा धंदा जनतेच्या लक्षात येत नसेल असं तुम्हाला वाटतं का?" असा सवाल त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, "तुम्ही अडीच वर्षांत वसुलीच केली. त्यामुळे लोककल्याणाच्या योजनांनी राज्य आर्थिक दिवाळखोरीत निघत नसतं, तर सत्तेत असताना वसुली आणि हप्तेखोरी केल्यामुळे राज्य दिवाळखोरीत निघत असतं, हे तुम्हाला कसं कळणार? आणि हे कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सामनामध्ये वाटेल ते लिहून शाई वाया घालवू नका," असा टोला केशव उपाध्येंनी उबाठा आणि संजय राऊतांना लगावला आहे.