यंदा १५ ऑगस्टचा भारतीय स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष दिन एकत्र आले. यानिमित्ताने पारशी समाजातील स्वातंत्र्यसैनिक असणार्या काही ठळक व्यक्तींचा परिचय करुन देणारा हा लेख...
महाभारत आणि पुराणे ‘पारसिक’ नावाच्या लोकसमूहाचा उल्लेख करतात. आजचा पाकिस्तान हा पूर्वी पंजाब आणि सिंध होता. आजचा अफगाणिस्तान हा पूर्वी गांधार होता. हे तर रीतसरच भारतवर्षाचे भाग होते. त्यांच्या पलीकडचे ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि पर्शिया ऊर्फ इराण हे बृहत्तर भारतातले भाग होते. यातला ताजिकिस्तान हा पूर्वेला चीनला भिडलेला आहे. साधारण सन पूर्व पहिल्या शतकात ताजिकिस्तान आणि चीनच्या या सीमावर्ती भागातून कुशाण नामक टोळीवाल्यांनी उत्तर भारतावर आक्रमणे केली. तशीच त्यांनी ती पर्शियावरही केली.तिथल्या पारसिक लोकांना त्यांनी गुलाम बनवून स्वत:च्या नोकरीत ठेवले. कुशाणांनी गांधारपासून पार मथुरेपर्यंतचा उत्तर भारत जिंकून त्यावन क्षत्रप म्हणून म्हणजे सुभेदार म्हणून या पारसिक किंवा शक लोकांना नेमले. ‘क्षत्रप’ हा शब्द संस्कृत भासतो. पण, तो मुळात ‘सत्रप’ असा जुन्या फारसी भाषेतला शब्द आहे. या शक-क्षत्रपांचा उच्छेद करून शालिवाहन राजाने भारताला परकीय आक्रमणापासून मुक्त केले.
यानंतर, भारताच्या विविध भागांमध्ये अनेक राजवटींचे उत्कर्ष-अपकर्ष चालू राहिले. पर्शियामध्ये इसवी सनाच्या तिसर्या शतकात ‘ससानियन’ नावाच्या साम्राज्याचा उदय झाला. या पारसिक लोकांची मूळ उपासनापद्धती काय होती कोण जाणे. पण, त्यांनी पुढे झरतुष्ट्र या संताने प्रतिपादन केलेली अग्नीची उपासना स्वीकारली होती. इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत ससानियन साम्राज्य सुखाने नांदत होते.
इसवी सन ६३४ मध्ये त्यांच्या शेजारच्या अरबस्तानातून इस्लाम नावाचा एक नवाच निघालेला उपासना संप्रदाय टोळधाडीप्रमाणे त्यांच्यावर कोसळला. इ. स. ६५१ मध्ये म्हणजे फक्त १७ वर्षांत इस्लामी आक्रमकांनी ससानियन साम्राज्याचा पूर्ण पाडाव केला. मग, सर्वत्र सुरू झाल्या कत्तली. अग्निमंदिरांचा विध्वंस आणि बाटवाबाटवी. तरी अग्निपूजकांनी शंभर-दीडशे वर्षे तग धरला असावा. कारण, त्यांची पहिली शरणार्थी टोळी सुमारे ७५८ साली गुजरातच्या किनार्यावर आली, असे मानले जाते. तेव्हापासून पुढची सुमारे २०० वर्षे ते पर्शियातून गुजरातमध्ये येतच राहिले. पर्शियातून आले म्हणून किंवा ‘पारसिक’ हे मूळ संस्कृत नाव होतेच म्हणून, या नवागतांना ‘पारसी’ किंवा ‘पारशी’ असे म्हणू लागले. पारशांच्या परंपरेनुसार गुजरातच्या खंबातच्या आखाताच्या किनारपट्टीवर या वेळी ‘जाडी राणा’ नावाचा राजा राज्य करत होता. त्याने तीन अटींसह पारशांना आपल्या राज्यात वास्तव्य करायला परवानगी दिली. एक म्हणजे, पारशांनी आमची भाषा (म्हणजे गुजराती) स्वीकारावी. दुसरे म्हणजे पारशी स्त्रियांनी स्थानिक स्त्रियांप्रमाणेच लुगडे-साडी हा पेहराव करावा आणि तिसरे म्हणजे त्यांनी शस्त्र बाळगू नये.
पारशांनी या अटी स्वीकारल्या. आठव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ‘शिलाहार’ या राजघराण्याची सत्ता होती. त्यामुळे एकतर हा ‘जाडी राणा’ कुणीतरी शिलाहार राजा असावा किंवा शिलाहारांचा दक्षिण गुजरातचा सुभेदार असावा, अशी शक्यता. कारण, पारशांचे गुजरातमधले वसाहतीचे मूळ गाव संजाण हे वलसाड जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रापासून अगदी जवळ आहे. असो. नंतरच्या काळात हे पारशी लोक गुजरात आणि महाराष्ट्रातही ठिकठिकाणी पसरले. कारण, त्यांचा पोटापाण्याचा मुख्य व्यवसाय राहिला व्यापार. इसवी सनाच्या नवव्या शतकात भारतात येऊन गेलेला अल् मसौदी हा अरब प्रसावी सिंध प्रांतातल्या पारशांच्या अग्निमंदिरांची-अग्यारींची नोंद करतो. तर, चौदाव्या शतकात जोर्डानस हा फ्रेंच पाद्री आपण ठाणे आणि भडोच या ठिकाणी पारशी लोकांना पाहिल्याचा उल्लेख करतो. आज ठाणे हे मुंबईचे उपनगर बनले आहे. चौदाव्या शतकातले ठाणे हे राजा भीमदेव (बिंबदेव) यादवाच्या राज्यातले एक अत्यंत समृद्ध असे नगर-बंदर होते. त्याचे नाव होते श्रीस्थानक.
इसवी सन १६८७ साली ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतेहून मुंबईला हलवले. यावेळी असंख्य इंग्रज व्यापारी, गुजराती भाटिये, लोहाणा कच्छी यांच्याचप्रमाणे पारशी व्यापारी मुंबईला आले. पुढच्या पन्नासच वर्षांत म्हणजे इ. स. १७३६ साली ईस्ट इंडिया कंपनीने सुरतेहून लवजी नसरवानजी वाडिया या जहाजबांधणी तज्ज्ञाला मुद्दाम मुंबईत बोलावून आणले. एकंदरीत, इंग्रजी राज्यात पारशी लोक सर्व भारतभर पसरले, ते उत्तम व्यापारी तर होतेच, पण इंग्रजांच्या साहचर्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवून अनेक पारशी लोक कायदा आणि अर्थतज्ज्ञ बनले. म्हणून, आपल्याला असे दिसते की, स्वातंत्र्यपूर्व काळात असंख्य पारशी लोक वकिलीच्या आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायात होते.
दादाभाई नौरोजी
भारतीय राजकारणाचे किंवा अर्थकारणाचे जनक असा ज्यांचा सार्थ गौरव केला जातो, त्या दादाभाई नौरोजींबद्दल विपुल लेखन, पुस्तके उपलब्ध आहेत. आपण या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींची एकवार उजळणी करू. दादाभाईंचा जन्म १८२५ साली गुजरातेत नवसारी इथे झाला. म्हणजे, संपूर्ण भारत इंग्रजी अमलाखाली येऊन सातच वर्षे उलटलेली होती. दादाभाईंचे शिक्षण मात्र मुंबईला ’एलफिन्स्टन’ या अव्वल दर्जाच्या शिक्षण संस्थेत झाले. वयाच्या ३०व्या वर्षी म्हणजे १८५५ साली याच ‘एलफिन्स्टन’ कॉलेजने दादाभाईंना गणित आणि तत्त्वज्ञान या विषयांचे प्राध्यापक म्हणून पाचारण केले. हा सन्मान मिळवणारे ते पहिले भारतीय होत. पण, या आधीच म्हणजे १८५४ साली त्यांनी गुजरातीत ’रास्त गोफ्तार’ (सत्य निवेदक) आणि इंग्रजीत ’व्हाईस ऑफ इंडिया’ अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. पण, १८५५ सालीच दादाभाई इंग्लंडला गेले आणि १८५९ साली त्यांनी लंडनमध्ये स्वतःची कॉटन ट्रेडिंग कंपनी सुरू केली.
’एथनोलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ नावाची एक इंग्रजी अहंकाराने फुगलेली संस्था होती. तिने असे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवला होता की, आशियाई लोक हे युरोपीय लोकांपेक्षा वांशिकदृष्ट्या हीन आहेत. नीच आहेत. या बदनामीला हाणून पाडण्यासाठी दादाभाईंनी ’१८६७ साली लंडनमध्ये ’ईस्ट इंडिया असोसिएशन’ ही संस्था स्थापन करून त्या अपप्रचाराला प्रभावी उत्तर दिले. या असोसिएशनमधूनच पुढे १८८५ साली ‘काँग्रेस’ या भारतातल्या पहिल्या राजकीय पक्षाची स्थापना झाली. दादाभाईंची सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे इंग्रज सरकार भारतातून दरवर्षी सर्व प्रकारच्या संपत्तीची कशी पद्धतशीरपणे कूट करीत आहे, हे त्यांनी आकडेवारीसह मांडले.
फिरोजशहा मेहतांचा जन्मही मुंबईचा आणि मृत्यूही मुंबईला. (१८४५ ते १९१५) ’मुंबईचा सिंह’ किंवा ’मुंबईचा अनभिषिक्त राजा’ म्हणूनच तेे विख्यात आहेत. मुंबई महापालिकेच्या कारभारात सतत सुधारणा करून तिला सतत अव्वल क्रमांकावर ठेवणे, ही फिरोजशहांची मोठी कामगिरी. ‘बॅरिस्टर’ होण्यासाठी लंडनला गेलेले असताना फिरोजशहा दादाभाईंच्या संपर्कात आले. परिणामी, भारतात परतल्यावर वकिली व्यवसायाबरोबरच त्यांनी मुंबईत १८६९ साली दादाभाईंच्या वरील ’ईस्ट इंडिया असोसिएशन’ची शाखा सुरू करून गोर्या लोकांच्या दादागिरीला आव्हान दिले. स्वदेशीच्या प्रचारासाठी यांनी न्यायमूर्ती तेलंग यांच्यासोबत साबण कारखाना सुरू केला. मुंबईचा ’टाइम्स’ हा कायमच इंग्रजधार्जिणा होता. (आज तो आणि त्याची भावंडे काळ्या इंग्रजांची धार्जिणी आहेत.) त्याला उत्तर देण्यासाठी त्यांनी १९१३ साली ’बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. राष्ट्रीय विचारांचे ते पहिले इंग्रजी वृत्तपत्र.
दि. २२ ऑगस्ट १९०७ या दिवशी मादाम भिकाईजी रुस्तम कामा या महिलेने भारताचा तिरंगा ध्वज जर्मनीत स्टुटगार्ट येथे ’इंटरनॅशनल सोशालिस्ट कॉन्फरन्स’मध्ये फडकवला, हे तर आपल्याला माहीतच आहे, पण त्या जर्मनीत गेल्या कशा? मादाम भिकाईजी यांचा जन्म १८६१ साली मुंबईत झाला. त्यांचे वडील सोराबजी पटेल आणि पती रुस्तम कामा हे व्यवसायाने वकील होते. भिकाईजींना सामाजिक कार्यासाठी वेळही होता आणि आवडही होती. १८९६ साली महाराष्ट्रात प्रथम भीषण दुष्काळ पडला आणि मग प्लेगची भयानक साथ आली. मुंबईच्या ‘ग्रँट मेडिकल कॉलेज’च्या समन्वयाने अनेक स्वयंसेवी संस्था आणि व्यक्ती लोकसेवेसाठी पुढे सरसावल्या. मादाम कामा त्यातल्याच एक. परंतु, सेवाकार्य करताना मादाम स्वतःच प्लेगने पछाडल्या गेल्या, पण बचावल्या. कौटुंबिक डॉक्टरने त्यांना हवापालट करण्यासाठी लंडनला जाण्याचा सल्ला दिला.
१९०२ साली लंडनला पोहोचलेल्या मादाम कामा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा आणि बॅरिस्टर सरदार सिंह राणा या दोन देशभक्तांच्या संपर्कात आल्या. भारतातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे दोघे जण ’इंडिया हाऊस’ हे एक होस्टेल चालवत होते. १९०६ साली विनायक दामोदर सावरकर हा २३ वर्षांचा तरुण ’इंडिया हाऊस’वर पोहोचला आणि मादाम कामांसह सगळेच ’अभिनव भारत’चे सदस्य बनले. सावरकर पकडले गेल्यावर मात्र ’अभिनव भारत’ची वाताहत झाली. मादाम कामा मोठ्या मुश्किलीने १९३५ साली मुंबईला परतल्या आणि दि. १३ ऑगस्ट १९३६ या दिवशी वयाच्या ७४व्या वर्षी पारशी जनरल हॉस्पिटलमध्ये बेवारस मरण पावल्या.
खुर्शीद फ्रामजी नरिमन यांना ‘वीर नरिमन’ या नावाने जास्त ओळखले जाते. आज आपण ज्याला ’मरीन ड्राईव्ह’ म्हणून ओळखतो, तो संपूर्ण भाग समुद्रात मातीचा भराव घालून तयार केलेला आहे. म्हणून, याला ’बॅक बेे रेक्लेमेशन’ असेही म्हणतात. त्या ‘बॅकबे रेक्लेमेशन’पासून सुरू होऊन चर्चगेट स्टेशन, हुतात्मा चौक ते हॉर्निमन सर्कलपर्यंतच्या रस्त्याला त्यांच्या स्मरणार्थ ’वीर नरिमन रस्ता’ असेच नाव आहे. कारण, ते या रस्त्यावरच्या ’रेडिमनी हाऊस’ या प्रख्यात इमारतीत राहत होते. दुसरे म्हणजे, ‘बॅक बे रेक्लेमेशन योजने’त जेम्स बुकॅनन या इंग्रज अभियंत्याने भरपूर भ्रष्टाचार केला होता. १९२८ साली वीर नरिमन यांनी मुंबई महापालिकेत या भ्रष्टाचाराविरोधात प्रचंड आघाडी उघडली. वीर नरिमन महात्मा गांधींचे आणि सरदार पटेलांचे एकनिष्ठ अनुयायी होते. १९३०च्या गांधीजींच्या ‘सविनय कायदेभंग चळवळी’त मुंबई प्रांतिक काँग्रेसचे ते प्रमुख होते. ते उत्तम वकील होते. त्यांचा जन्म १८८३चा आणि मृत्यू १९४८चा. १९७० साली ‘बॅक बे रेक्लेमेशन योजना आणखी वाढवून खूप मोठा परिसर, समुद्रमार्ग हटवून निर्माण करण्यात आला. या परिसराला ‘नरिमन पॉईंट’ हे नाव देण्यात आले.
फिरोज गांधी
फिरोज जहांगीर घंडी यांचे मूळ गाव भडोच. परंतु, जहांगीर घंडी हे मुंबईच्या ‘किलिक निक्सन कंपनी’त मरीन इंजिनिअर असल्यामुळे ते मुंबईत ग्रँटरोडजवळ खेतवाडीत राहत असत. तिथेच १२ सप्टेंबर १९१२ या दिवशी फिरोज यांचा जन्म झाला. ते आठ वर्षांचे असताना जहांगीर यांचा मृत्यू झाला. यामुळे फिरोज, इतर चार भावंडे आणि आई रतीमाई घंडी यांनी रतीमाईंची बहीण डॉ. शिरीन कमिसारियट यांच्याकडे आश्रय घेतला. डॉ. शिरीन प्रयागराज (तेव्हा अल्लाहाबाद) च्या लेडी डफरीन रुग्णालयात सर्जन होत्या. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीत फिरोज घंडी कमला नेहरूंच्या संपर्कात आले आणि त्यांनी कॉलेज शिक्षण सोडून आंदोलनात उडी घेतली. पुढे १९४२च्या ऑगस्टमध्ये कमला-जवाहर यांची मुलगी इंदिरा हिच्याशी विवाह करताना महात्मा गांधींनी त्यांना ’घंडी’ऐवजी ’गांधी’ बनवले. अलीकडे फिरोज गांधींबद्दल समाजमाध्यमे अ-विद्यापीठावर अनेक कंड्या पिकवल्या जात असतात. याकरिता जिज्ञासूंनी ’फिरोज : द फरगॉटन गांधी’, लेखक बर्टिल फाक, प्रकाशक रोली बुक्स, प्रकाशन वर्ष २०१६ हे पुस्तक अवश्य पाहावे. या पाच पारशी स्वातंत्र्यसैनिकांखेरीज आणखीही कोणी पारशी स्वातंत्र्यसैनिक माहीत असल्यास वाचकांनी अवश्य कळवावे.