गेल्या दोन वर्षांत राज्याने चौफेर प्रगती केली! स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन

    15-Aug-2024
Total Views |
 
Shinde
 
 
 
मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्याने चौफेर प्रगती केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे. देशाच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रशासनातील सर्व प्रधान सचिव, अधिकारी आणि मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी असून त्या जबाबदारीचं स्मरण करुन देणारा हा दिवस आहे. गेल्या दोन वर्षात राज्याने चौफेर प्रगती केली आहे. देशाच्या नकाशावर महाराष्ट्राने आपलं नाव कोरलं आहे. विदेशी गुंतवणूक, समाजातील दुर्बल घटकांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना या माध्यमातून नागरिकांप्रति असलेली बांधिलकी दाखवून दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ५ ट्रिलियन डॉलर्स बनवून जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी आगेकूच सुरू आहे. त्यात आपल्या राज्याचा वाटा मोठा असणार आहे."
 
हे वाचलंत का? -  १७ तारखेपर्यंत १ कोटींपेक्षा जास्त भगिनींना पैसे मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
 
"विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही गेल्या दोन वर्षांत अनेक महत्वपूर्ण पावलं टाकली आहेत. गेल्या सरकारमध्ये महाराष्ट्र हा देशातील राज्यांच्या विकासाच्या क्रमवारीत खाली घसरताना दिसत होता. राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर आणण्याचं चॅलेंज आपल्यासमोर होतं आणि ते आपण सगळ्यांनी समर्थपणे पेललेलं आहे," असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, "नुकतीच राज्याने लॉजीस्टिक धोरण तयार केले असून त्या माध्यमातून ३० हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. देशाच्या एकूण उत्पन्नात राज्याचा वाटा १४ टक्के असून, उद्योग आणि सेवा क्षेत्रात राज्य अग्रेसर आहे. शेतकरी, युवक, कामगार, महिला भगिनी सर्वांचा सर्वांगीण विकास करण्यास शासन कटिबद्ध आहे," अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री शिंदेंनी दिली.