वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक चळवळ!

सेवाभावाद्वारे आधुनिक उपचार देणारे आरोग्य केंद्र श्री गुरुजी रुग्णालय, नाशिक

    14-Aug-2024
Total Views |
dr hedgewar hospital


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच दुर्गम भागांत राहणार्‍या आदिवासी आणि गोरगरिबांची मदत करण्यात आघाडीवर असतो. छ. संभाजीनगर येथील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान’ने सुरू केलेले ‘डॉक्टर हेडगेवार रुग्णालय’ हे त्याचे एक उत्तम उदाहरण. त्याच धर्तीवर सुरु झालेल्या नाशिकच्या ‘श्री गुरुजी रुग्णालया’ची आज अध्यक्ष डॉ. विनायक गोविलकर व सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली दमदार वाटचाल सुरू आहे. कोणतेही सरकारी अनुदान न घेता, कर्ज न काढता किंवा कोणतीही आकर्षक योजना जाहीर न करता, 18 महिन्यांत हे दिमाखदार रुग्णालय उभे राहिले. मार्च 2013 पासून 65 खाटांचे ‘श्री गुरुजी रुग्णालय’ सुरू झाले. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते त्याचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते.

श्री गुरुजी रुग्णालयात विविध आजार, विकारांवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील रेडिएशन, केमोथेरपी आणि ऑपरेशन असे सर्व उपचार येथे उपलब्ध आहेत. 2013 सालापासून आत्तापर्यंत 90 हजार रुग्ण अंतररुग्ण विभागात दाखल झाले आहेत. तसेच, सुमारे 11 लाख, 22 हजार, 50 रुग्णांनी ‘ओपीडी’मध्ये उपचार घेतले आहेत. या रुग्णालयात कोणतीही सेवा विनामूल्य मिळत नाही, तरीही अत्यंत वाजवी दरात, नाशिक शहरातील अन्य रुग्णालयांपेक्षा 30 ते 35 टक्के कमी दरात वैद्यकीय सुविधा पुरवल्या जातात. या सामाजिक चळवळीला दानशूर व्यक्ती भरघोस देणग्या देतात. मात्र, त्यातील एकही पैसा या रुग्णालयाच्या दैनंदिन व्यवहारासाठी वापरला जात नाही. नवीन सुविधा, बांधकाम, आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठीच हा निधी वापरला जातो.


‘कोविड’ काळातील सेवा

‘कोविड’ काळात श्री गुरुजी रुग्णालयात 48 खाटा उपलब्ध करून येथे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात आली. या कार्यासाठी रुग्णालयाला पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. हे काम पाहून नाशिकममधील काही उद्योजकांनी एकत्र येऊन 80 लाख रुपयांचा एक ऑक्सिजन प्लांट रुग्णालयाला उपलब्ध करून दिला.


बीएसएस कम्युनिटी कॉलेज

श्री गुरुजीरुग्णालय सुरु झाल्यानंतर डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय मिळाले; परंतु तांत्रिक, साहाय्यकपदावर माणसे मिळणे कठीण झाले होते. त्यासाठी रुग्णालयाने एक वर्ष मुदतीचे चार अभ्यासक्रम तयार केले. या विद्यार्थ्यांना पाच दिवस रुग्णालयात सेवाअनुभव आणि शनिवार-रविवार प्रशिक्षण मिळते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्रही दिले जाते. त्यातील काहीजण याच रुग्णालयात आज कार्यरत आहेत.


सेवा संकल्प समिती

नाशिक जिल्ह्यातील 26 पाड्यांवर श्री गुरुजी रुग्णालयाची गाडी दररोज जाते. तिथे गरजूंना प्रथमोपचार दिले जातात. ज्या रुग्णांना मोठ्या उपचाराची गरज असेल, त्यांना रुग्णालयात दाखल करुन उपचार देण्यापर्यंत सर्व काम रुग्णालयाचे कर्मचारी करतात. या पाड्यातील नागरिकांची मोतीबिंदूची शस्त्रक्रियादेखील याच पद्धतीने त्यांना रुग्णालयात दाखल करुन विनामूल्य आली आहे. 2010 साली ‘सेवा संकल्प समिती’ सुरू केली आणि त्याअंतर्गत ग्रामीण भागातील सहा आयाम घेऊन त्यावर काम सुरू केले गेले. त्याअंतर्गत 15 पाड्यांमध्ये बोरवेलची निर्मिती करून त्यावर टाकी लावून नळाद्वारे पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. रुग्णालयातर्फे संपूर्ण साधनसामग्री दिली जाते आणि गावातील लोक श्रमदानही करतात. तसेच सहा ते सात पाड्यांमध्ये मंदिरे बांधून दिली आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक थोडेफार अध्यात्माला लागून दारू, अन्य व्यसने त्यांनी सोडल्याची उदाहरणेही दिसून येतात. याशिवाय, वेगवेगळ्या गावांमध्ये वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात. असा हा वैद्यकीय व सामाजिक चळवळीचा सेवायज्ञ अखंडपणे सुरु आहे.


सेवासुविधांचा विस्तार
 
श्री गुरुजी रुग्णालयाचे विस्तारीकरण हे साधारण 1.80 लाख चौ. फूट एवढ्या जागेत असून, 11 मजली इमारत उभी राहणार आहे. यामध्ये नव्याने 170 ते 180 बेड्स व अन्य सुपर स्पेशॅलिटी सुविधा अंतर्भूत केल्या जाणार आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वी पूर्णत्वासाठी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील या सामाजिक चळवळीला सतत तेवत ठेवण्यासाठी समाजातील आपल्यासारख्या हितचिंतक आणि पाठीराखे यांच्यासोबत आणि सहकार्याच्या अपेक्षेत!


रुग्णसेवा सदन निर्मिती : दीड एकर जागेवर रुग्णसेवा सदन निर्माण करण्यात आले आहे. कार्डियाक सेंटर आणि कॅन्सर सेवेचा देखील विस्तार झाला आहे.

समर्पित सेवायज्ञात समिधा : आज अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, सुसज्ज असा कॅन्सर आणि कॅन्सर शस्त्रक्रिया विभाग, स्त्रीरोग, दंतरोग विभाग तसेच सुसज्ज असा आयुर्वेदिक विभाग, ऑक्युपेशनल थेरपी विभाग, फिजिओथेरपी व स्पीच थेरपी आणि सुसज्ज पॅथॉलॉजी, रेडिओलॉजीचे निदान तंत्र विभाग, आयसीयू व डायलिसीस तसेच सेवेसाठी तत्पर असणार्‍या साधारण 400 कार्यकर्त्यांचा समूह असा मोठा विस्तार रुग्णालयाच्या अल्पावधीतच झाला आहे. याचबरोबरीने रुग्णालयाचा कार्डियाक विभागही सप्टेंबर 2023 पासून समाजाच्या सेवेत रुजू झाला आहे.

श्रीमती रमागौरी रतीलल दामाणी हृदयरोग विभाग व महात्मा ज्योतिबा फुले योजना : कॅन्सर, कार्डियोलॉजी आणि डायालिसीस यांसारख्या दुर्धर आजारांसाठी रुग्णालयात आता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनंतर्गत उपचार घेतले जाऊ शकतात.

‘डॉ. मुंजे नेत्रपेढी’तर्फे सेवा-रुग्णालय व ‘सेवा संकल्प समिती’च्या माध्यमातून एक हजारांहून अधिक वनवासी पाड्यांवरील रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. ‘सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’च्या पाठबळाने ‘धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे नेत्रपेढी’चा आरंभ दि. 6 डिसेंबर 2017 रोजी झाला. आजपर्यंत नेत्रपेढीमार्फत 170 ‘कॉर्निया’ जमा केले गेले. तसेच, एकूण 100 पेक्षा जास्त रुग्णांना दृष्टिदान करण्यात आले.


डॉ. राजेंद्र खैरे
(लेखक श्री गुरुजी रुग्णालय येथे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत.)