'चलो एक और पिक्चर लिखते है!'; ‘शोले’, ‘दीवार’ची हिट जोडी सलीम-जावेद पुन्हा एकत्र

    14-Aug-2024
Total Views |

salim javed  
 
 
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीला २० पेक्षा अधिक सुपरहिट चित्रपट देणारी जोडी सलीम-जावेद पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आजवर या जोडीने शोले, दीवार, जंजीर, शक्ती असे अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना दिले. आता या दोघांच्या यशाची कहाणी सांगणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’ ही अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लाँच जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
 
सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला आहे. पटकथा लिखाणापासून त्या दोघांनी प्रवास सुरु केला. आणि मग ‘हाथी मेरे साथी’पासून दोघांची चित्रपट लेखनाची वाट धरली. एकामागून एक लोकप्रिय चित्रपटांचे कथालेखन आणि पुढे यश मिळवल्यानंतर दोघांमध्ये आलेला दुरावा हा सगळा रंजक प्रवास उलगडणाऱ्या ‘अँग्री यंग मेन’ या माहितीपटाची निर्मिती सलीम खान यांचा मुलगा अभिनेता सलमान खान आणि जावेद अख्तर यांची दोन्ही मुले अभिनेता-दिग्दर्शक फरहान व दिग्दर्शिका झोया अख्तर यांनी मिळून केली आहे. नम्रता राव यांनी दिग्दर्शित केलेल्या या माहितीपटाची झलक सलीम खान आणि जावेद अख्तर दोघेही आपल्या मुलांसह, कुटुंबियांसह पाहिली.
 
 
 
एकेकाळी पटकथाकार म्हणून चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही सर्वाधिक मानधन घेणाऱ्या या जोडीच्या वैभवी कारकिर्दीचा इतिहास ‘अँग्री यंग मेन’ या तीन भागांच्या माहितीपटातून उलगडणार आहे. एवढंच नाही तर लवकरच एका नव्या चित्रपटासाठी एकत्र कथालेखन करणार असल्याचेही यावेळी जावेद अख्तर यांनी सांगितलं. दरम्यान, ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंट्री २० ऑगस्टला अॅमेझोन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.