मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेते गुरुचरण सिंग दोन महिन्यांपूर्वी कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले होते. त्यानंतर तब्बल २६ दिवसांनी ते परत आले होते. घर संसाराला कंटाळल्यामुळे एकांतवासात काही दिवस घालवायचे असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता घरी परतल्यानंतर मुंबईत ते काम शोधत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग यांच्यावर १.२ कोटी रुपयांचे कर्ज असून ते फेडण्यासाठी ते कामाच्या शोधात आहेत. गेल्या एका महिन्यापासून मुंबईत काम मिळवण्यासाठी त्यांची वणवण सुरु असल्याचे अभिनेत्याने सांगितले आहे. गुरुचरण म्हणाले की, “मी एका महिन्यापासून कामाच्या शोधात मुंबईत आहे. मला वाटतं की लोक माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना मला स्क्रीनवर पाहायचं आहे. मला माझ्या खर्चासाठी, माझ्या आईची काळजी घेण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी पैसे कमवायचे आहेत. मला काहीतरी चांगलं काम करून माझी दुसरी इनिंग सुरू करायची आहे. मला आता पैशांची खूप गरज आहे कारण मला ईएमआय व क्रेडिट कार्डची बिलं देखील भरावी लागतात. मला पैशांची गरज आहे, काही चांगले लोक आहेत जे मला उसने पैसे देतात. पण आता मला काम हवंय, कारण मला माझ्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घ्यायची आहे,” असं गुरुचरण सिंग यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
तसेच, गुरुचरण यांनी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून जेवणं सोडलं असून फक्त लिक्विड डाएट घेत असल्याचं गुरुचरणने सांगितलं आहे. “गेल्या ३४ दिवसांपासून मी जेवण बंद केलृ आहे. मी दूध, चहा आणि नारळपाणी एवढंच पित आहे. गेल्या चार वर्षांत मी फक्त अपयशच पाहिलं आहे. मी वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पण मला कशातच यश मिळालं नाही. आता मी थकलो आहे आणि आता मला पैसे कमवायचे आहेत,” असे गुरुचरण सिंग म्हणाले.
दरम्यान, या मुलाखतीवेळी त्यांनी त्यांच्यावरील कर्जाबद्दल सांगितलं. “माझ्यावर खूप कर्ज आहे. मला बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्यांचे ६० लाख रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. याशिवाय माझ्या ओळखीच्या काही लोकांनी मला पैसे दिले आहेत आणि त्यांचे कर्जही मला फेडायचे आहे. माझ्यावर एकूण १.२ कोटी रुपयांचे कर्ज आहे”.