मुंबई : स्वातंत्र्याचा उत्सव आपल्याला सैनिकांनी देशासाठी दिलेल्या शौर्य आणि बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या स्वातंत्र्याचा यंदाचा हा उत्सव द्विगुणित करण्यासाठी मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’ हा मराठी चित्रपट येत्या ३० ऑगस्टला चित्रपटगृहात दाखल होत आहे. शूरवीरांचा मोठा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आपले प्राण तळहातावर घेऊन देशाच्या रक्षणासाठी सीमेवर सुसज्ज असणाऱ्या जवानांमुळेच आपण सुरक्षित आहोत. सीमेवरच्या जवानांची अंगावर काटा आणणारी शौर्यकथा पोटतिडकीने मांडत, चैतन्य मराठे, भारत देशमुख या दोन जवानाचं आयुष्य आणि त्यांची निस्सीम देशसेवा यांच्यावर ‘फौजी’ चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
सौरभ गोखले, प्राजक्ता गायकवाड, अरुण नलावडे, नागेश भोसले, संजय खापरे, अश्विनी कासार, जयंत सावरकर यांसारखे अनेक कलाकार चित्रपटात आहेत. आपल्या देशासाठी, समाजासाठी आपला प्राण पणाला लावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासोबतच युवा पिढीला देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी ‘फौजी’ चित्रपटाची निर्मीती केल्याचे चित्रपटाचे निर्माते-लेखक-दिग्दर्शक घनशाम विष्णुपंत येडे यांनी सांगितले. ‘फौजी’ मराठी चित्रपट ३० ऑगस्टला राज्यभरात प्रदर्शित होणार आहे.