मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा मान्य आहे का? २४ तासांत जाहीर करा
चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेस-राष्ट्रवादीला सवाल
12-Aug-2024
Total Views |
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा मान्य आहे का? हे २४ तासांत जाहीर करा, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला आहे. तसेच लाडकी बहिण योजनेवर केलेल्या टीकेवरूनही बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचा चेहरा पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले आणि शरद पवार साहेबांना मान्य आहे का? काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे २४ तासांत जाहीर करावं. लाडकी बहिण योजनेला उद्धव ठाकरेंनी राजकीय हेतूने गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. खरंतर कर्नाटकमध्ये काँग्रेसने खोटारडेपणा केला. योजना जाहीर केल्या आणि निवडणूक झाल्यावर बंद केल्या. भाजपच्या सरकारमध्ये ज्या ठिकाणी योजना जाहीर झाल्या त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. उद्धव ठाकरे लबाड काँग्रेस पक्षासोबत असल्याने त्यांना लबाडी दिसत आहे."
"लाडकी बहिण योजना पाडण्यासाठी काँग्रेस पक्षाचे लोकं हायकोर्टात गेले. पण न्यायालयाने ही योजना सुरु ठेवली. ज्यांनी श्रीमंतांच्या आणि करोडपतींच्या घरी जन्म घेतला त्यांना या योजनेचं गांभीर्य कळणार नाही. विधानसभेत पराभव होईल अशी भीती आता उद्धव ठाकरेंना वाटत आहे. पण जोपर्यंत महायूतीचं सरकार आहे तोपर्यंत ही योजना सुरुच राहणार आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष या योजनेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा तेव्हा योजना बंद पडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले असताना त्यांनी केंद्रातल्या १५ योजना बंद पाडल्या होत्या. त्यामुळे या योजना चालू ठेवायच्या असल्यास जनता महायूतीला मतदान करेल," असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.