बाळासाहेबांचे पुत्र हेच ज्यांचे एकमेव कर्तृत्व आहे, त्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी पुन्हा आपली वर्णी लागावी, यासाठी नुकतेच दिल्लीला जात, सोनिया-राहुल यांच्यासमोर लोटांगण घातले. महाराष्ट्रातील लाखो भगिनींसाठी ‘लाडकी बहीण योजना’ महायुती सरकारने आणली, तिला अर्थातच ठाकरे आणि पवार कंपनीने विरोध केला आहे.
मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा आपलीच वर्णी लागावी, यासाठी दिल्ली दरबारी जाऊन काँग्रेसच्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणी लोटांगण घालून, नुकतेच उद्धव ठाकरे आपला तीन दिवसांचा दिल्ली दौरा आटोपून महाराष्ट्रात परतले. बाळासाहेब ठाकरे यांनी असे स्पष्टपणे म्हटले होते की, सोनियांपुढे जो झुकेल, तो ***. बाळासाहेब शरद पवारांवर म्हणूनच तर सडकून टीका करायचे. तथापि, बाळासाहेबांचा पुत्र हेच एकमेव ज्यांचे कर्तृत्व आहे, त्या उद्धव ठाकरे यांना, सोनियांसमोर लोटांगण घालण्यात काहीही लाज वाटत नाही. त्यांच्यासाठी सत्ता हेच सर्वस्व आहे. म्हणूनच, महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून, विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आपलीच कशी मुख्यमंत्रीपदी वर्णी लागेल, याच्याच विचारात ते आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाचे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात कानउघाडणीही केली आहे. मात्र, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
राज्यातील महायुती सरकारने ‘लाडकी बहीण योजना’ जेव्हा जाहीर केली, तेव्हाच काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या बुडाखाली जाळ झाला. ही योजना लोकप्रिय ठरणार, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नव्हती. राज्यभरातून या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला, त्यासाठी नावनोंदणीही भगिनींनी मोठ्याप्रमाणात केली. लवकरच या योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे. म्हणूनच, उद्धव ठाकरे यांचाही तिळपापड उडाला आहे. त्यासाठीच या योजनेच्या विरोधात ठाकरे आणि पवार कंपनीने अपप्रचार सुरू केला आहे. ‘लाडकी बहीण’ या योजनेच्या माध्यमातून हे सरकार तुम्हाला विकत घेऊ पाहत आहे. तथापि, आपण विकले जायचे की नाही, हे महिलांनी ठरवावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी या योजनेवर टीका केली आहे. ज्या व्यक्तीने सत्तेसाठी कोणत्याही स्तरावर जाण्याचे मान्य केले, ती व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ नका, असे सांगते यापेक्षा मोठा विरोधाभास कोणता असू शकतो?
२०१९ मध्ये राज्यातील भाजप-सेना युतीला स्पष्ट जनादेश राज्यातील जनतेने दिला. तथापि, केवळ स्वत:ची मुख्यमंत्रीपदाची लालसा पूर्ण करण्यासाठी, मला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी बसवायचे आहे, तसे वचन मी दिले आहे असे म्हणत, स्वतः उद्धव ठाकरे हे कोणतेही कर्तृत्व नसताना, मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य मंत्री केव्हा झाले, हे सामान्य शिवसैनिकालाही कळलेच नाही. अमित शाह यांनी बंद खोलीत न दिलेल्या वचनांचा दाखला त्यांनी त्यासाठीच दिला. भाजप खोटे बोलत आहे, असे निलाजरेपणाने सांगत त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्यासाठी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी केली. त्यासाठी सोनिया-राहुल गांधी यांच्यासमोर ते झुकले. ज्या दिवशी मला सत्तेसाठी काँग्रेससोबत जावे लागेल, त्यादिवशी मी माझे दुकान बंद केले असेल, असे तेजस्वी उद्गार ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी काढले होते, त्यांच्याच सुपुत्राने काँग्रेसचरणी आपल्या निष्ठा वाहत, स्वतःची वर्णी मुख्यमंत्रीपदी लावून घेतली होती.
बाळासाहेबांच्या तत्त्वांना हरताळ फासण्याचे पाप ज्या उद्धव यांनी केले, ते उद्धव म्हणूनच बंद खोलीत जे वचन दिलेच नाही, त्याचा दाखला देत, सोनिया-शरद पवार यांच्या चरणी लोळण घेत, स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. जनतेचा विश्वासघात करून, जे पद उद्धव यांनी पदरात पाडून घेतले, त्या पदालाही त्यांनी न्याय दिला नाही. महाराष्ट्रातील जनतेशी त्यांनी केलेली ही प्रतारणाच होती. कोणताही प्रशासकीय अनुभव नसल्यानेच, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी कामकाज पाहिले. साथरोगाचे संकट महाराष्ट्रात यांच्याच नाकर्तेपणामुळे गडद झाले. अशा वेळीही उद्धव मंत्रालयात केवळ दोनदा आले. पालघर येथे साधूंची जमावाने निर्घृणपणे हत्या केली. सचिन वाझे सारखा उद्धव यांनीच नेमलेला पोलीस अधिकारी १०० कोटींची वसुली गृहमंत्र्याच्या नावाखाली करत, मुंबईत आलिशान गाड्यांतून फिरत होता. अंबानीसारख्या उद्योगपतींच्या घराखाली स्फोटके लावण्यात आली, त्यातील प्रमुख साक्षीदाराची हत्या करण्यात आली, विरोधात बोलणार्या कंगना राणावत हिच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आला, तर अर्णब गोस्वामीसारख्या संपादकाला दहशतवाद्यासारखे अटक करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कट रचला होता, ही माहितीही नव्याने समोर आली आहे. एक, दोन नव्हे तर, चार गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्र आखण्यात आले होते. ज्या शरद पवारांच्या साथीने यांनी सत्ता उपभोगण्यासाठी जनतेचा विश्वासघात केला, त्या शरद पवारांनीही त्यांच्या आत्मचरित्रात यांच्या नाकर्तेपणावर भाष्य करत, यांना घरचाच आहेर दिला आहे. अपयशी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी यांच्यावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, हे ठाकरे आणि पवार कंपनी आणि त्यांचे बोलके पोपट सांगणार नाहीत. ‘लाडकी बहीण योजने’ला अपेक्षेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, हीच या ठाकरे आणि पवार कंपनीची पोटदुखी आहे. म्हणूनच, ही कंपनी योजनेच्या विरोधात अपप्रचार करत आहे, ती यशस्वी होणार नाही, असे उच्चरवाने सांगत आहे. सामान्यांसाठी एखादी योजना आणली, तर यांना म्हणूनच त्रास होतो आहे.
कर्नाटकात ज्या काँग्रेसने सवंग लोकप्रियतेसाठी अनेक रेवडीवाटपाचे कार्यक्रम हाती घेतले. नफ्यात असणार्या कर्नाटक परिवहन महामंडळावर कर्जाचा डोंगर चढवला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसी राहुल गांधी यांनी खटाखट पैसे खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले, ते यांना चुकीचे वाटले नाही. त्यासाठीचे पैसे कोठून आणणार, हा प्रश्न त्यांना तेव्हा पडला नाही. मात्र, महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी एक चांगली योजना आणली, तर त्याला विरोध सर्वप्रथम काँग्रेसनेच केला. ‘काँग्रेस बोले, उद्धव हाले’ या उक्तीप्रमाणे ठाकरे आणि पवार कंपनीनेही त्याला लगेचच विरोध केला. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार ज्या उद्धव ठाकरे यांनी सोडले, बाळासाहेबांच्या शिकवणीच्या विपरित ज्यांनी सत्तेसाठी सोनिया-राहुल यांच्यासमोर हुजरेगिरी करण्याचे धोरण अवलंबले, तेच आज हिंदुत्वाचा ढोल वाजवत आहेत. ‘लाडकी बहीण योजने’ला विरोध करत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव!