जून तिमाहीत कोळशाच्या आयातीत ५.७ टक्क्यांची वाढ!

    11-Aug-2024
Total Views |
coal import bharat rised



नवी दिल्ली :         देशात कोळसा आयात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ५.७ टक्क्यांनी वाढून ७५.२ दशलक्ष टन झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ७१.१ दशलक्ष टन इतकी वाढ नोंदविण्यात आली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, कोळशाची आयात जूनमध्ये ६.५९ टक्क्यांनी वाढून २२.९ दशलक्ष टन झाली असून मागील वर्षी याच तिमाहीत २१.५ दशलक्ष टन कोळसा आयात करण्यात आला होता.

तज्ज्ञांच्या मते, उपलब्ध अतिरिक्त कोळसा आणि पावसाळ्यात औद्योगिक क्रियाकलाप मंदावल्यामुळे येत्या काही महिन्यांत आयात मागणी कमी राहू शकते. तर दुसरीकडे, जून तिमाहीत कोळशाची आयात ५.७ टक्क्यांनी वाढून ७५.२ दशलक्ष टन झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशाची कोळसा आयात ७.७ टक्क्यांनी वाढून २६८.२ दशलक्ष टन इतकी झाली आहे.

जून २०२४ मध्ये एकूण आयातीपैकी, नॉन-कोकिंग कोळशाची आयात १४.१ दशलक्ष टन इतकी होती. गेल्या वर्षी जूनमधील आयात केलेल्या कोळशाच्या आयातीपेक्षा १३.२ दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे. कोकिंग कोळशाची आयात ५४.५ लाख टन इतकी होती तर जून २०२३ मध्ये ५३.३ लाख टन आयात करण्यात आली होती.

भारताची कोळसा आयात २०२३-२४ या आर्थिक वर्षात ७.७ टक्क्यांनी वाढून २६८.२ दशलक्ष टन झाली आहे. तर आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कोळसा आयात २४९ दशलक्ष टन होती. गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत कोळसा उत्पादनात ११.७१ टक्क्यांनी वाढ होऊन ९९.७८ कोटी टन इतके झाले असून आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्पादन ८९.३१ कोटी टन इतके होते.