भारत सरकारने ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’चे सर्वोच्च अधिकारी ‘डायरेक्ट जनरल बीएसएफ’ आणि त्यांचे ‘सेकंड इन कमांड’ यांना त्यांच्या पदावरून नुकतेच हटविले आहे. असे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडले आणि याचे मुख्य कारण आहे की काश्मीर सीमेवर तैनात असलेल्या ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ना पाकिस्तानकडून होत असलेली दहशतवाद्यांची घुसखोरी थांबवण्यामध्ये आलेले अपयश. त्यामुळे जम्मू-उधमपूर भागामध्ये दहशतवाद्यांचा हिंसाचार हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याची कारणमीमांसा आणि उपाययोजना यांचा उहापोह करणारा हा लेख...
लोकसभेकरिता विक्रमी यशस्वी मतदान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झालेली आहे. या हल्ल्यांचे वैशिष्ट्य आहे की, हे हल्ले आता काश्मीर खोर्याच्याऐवजी पिर पंजाल पर्वतरांगांच्या दक्षिणेला जम्मू-उधमपूर भागामध्ये होत आहे. याआधी दहशतवादी काश्मीर खोर्यामध्ये ‘सॉफ्ट टार्गेट’, म्हणजे हिंदू, बायका, तिथे काम करायला आलेले बाहेरच्या प्रदेशातील नागरिक यावरती हल्ले करून त्यांना मारायचे. मात्र, आता हल्ले सुरक्षा दले खास तर भारतीय सैन्यावरती होत आहे. यामध्ये दहशतवादी नक्कीच मारले जात आहेत. परंतु, भारतीय सैन्यालासुद्धा पुष्कळ रक्त सांडावे लागत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ३२ दहशतवादी हल्ल्यांमध्ये १७ नागरिक, १९ सैनिक आणि ३३ दहशतवादी मिळून ६९ ठार झाले.याच काळात पाकिस्तानी सैन्याचे ३२६ सैनिक दहशतवादीविरोधी अभियानात मारले गेले. भारताच्या विरोधात काम करणारे अनेक दहशतवादी नेतेसुद्धा मारले गेले. पाकिस्तानला वाटते की, यामध्ये भारताच्या गुप्तहेर संस्थांचा हात असावा. म्हणून पाकिस्तान भारतीय सैन्यावरती हल्ले करून त्याचा बदला घेत असावा.
काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणण्याकरिता
पाकिस्तानला पुन्हा एकदा दहशतवादी हिंसाचार वाढवून, काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रकाश झोतामध्ये आणायचा आहे. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर पाकिस्तानने त्यांच्या स्पेशल फॉर्सेसचे ६०० सैनिक घुसवून कारगिलसारखी परिस्थिती निर्माण करण्याची त्यांनी तयारी केली आहे, अशा बातम्या येत आहेत. अर्थात या बातम्या अतिरंजीत आहेत आणि इतके दहशतवादी आत येणे सोपे नाही. मुख्य प्रश्न असा आहे की, पाकिस्तान आत्ताच हल्ले का करत आहे? याकरिता काही महत्त्वाची कारणे आहेत. एक तर जम्मू भागातील ‘राष्ट्रीय रायफल’ना तिथे दहशतवाद संपल्यामुळे लडाखमध्ये चीनच्या विरोधात तैनात केले गेले. तिथे जी पोकळी निर्माण झाली, त्यामध्ये पाकिस्तानने दहशतवादी घुसवले आहेत. दुसरे आता दहशतवाद्यांची घुसखोरी ही ‘एलओसी’वरून व्हायच्याऐवजी, आंतरराष्ट्रीय सीमेवरून होत आहे. ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ला ही घुसखोरी थांबवण्यामध्ये यश मिळालेले नाही. ‘एलओसी’चे रक्षण करण्याकरिता भारतीय सैन्य तैनात आहे आणि तिथे ९५ टक्के दहशतवादी हे ‘एलओसी’वरच मारले जातात, जसे मागच्या आठवड्यात दोन दहशतवादी पुँछमध्ये मारले गेले.
पाकिस्तानी सैन्याचे महत्त्व वाढवण्यासाठी
काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानचे सर्वात मोठे राजकीय नेते नवाझ शरीफ यांनी विधान केले होते की, त्यांना भारताच्याबरोबर आपले संबंध सुधारायचे आहे. परंतु, आता असे दिसते की, पाकिस्तानमधल्या सरकारला फारसे महत्त्व नाही आणि पाकिस्तानी सैन्य काय करायचे, याचा निर्णय घेईल. विविध कारणांमुळे पाकिस्तानी सैन्याची प्रतिमा पाकिस्तानमध्ये रसातळाला पोहोचलेली आहे आणि त्यांना वाटते की, काश्मीरमध्ये हिंसक कारवाया करून ते पाकिस्तानी सैन्याचे महत्त्व वाढवू शकतील. सामरिक किंवा स्ट्रॅटेजिक लेव्हलला पाकिस्तानला वाटते आहे की, सध्याच्या भारत सरकारला कुठलाही मोठा निर्णय घ्यायच्या आधी बरोबरच्या राजकीय पक्षांना बरोबर घेऊन चालावे लागेल. त्यामुळे कठीण कारवाई म्हणजे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंबर तीन करायला अडचणी येत असाव्यात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात सगळीकडे गोंधळ
आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात सगळीकडे गोंधळ माजलेला आहे आणि ५० ते ६० ठिकाणी जगात विविध कारणांमुळे युद्ध सुरू आहे. भारताकरिता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘जगाचे पोलीस’ या भूमिकेतील अमेरिका सध्या त्यांच्या अंतर्गत निवडणुकांमध्ये गुंतलेली आहे आणि त्यांचे बाकी कुठेच लक्ष नाही. याशिवाय जगाचे लक्ष हे युक्रेन युद्ध आणि इस्राएलविरुद्ध हमास, हेझबुल्ला युद्धाकडे जास्त आहे. कारण तिथे प्रचंड हिंसाचार होत आहे. हे कमी की काय म्हणून, चीन तैवानवरती सतत आक्रमक कारवाया करत आहे आणि दक्षिण चीन समुद्रामध्येसुद्धा चिनी आक्रमक कारवाया वाढल्या आहेत, ज्याविषयी ३० जुलैला मीडियामध्ये बातम्या आल्या आहेत. अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना वाटते की, युक्रेन युद्ध आणि इस्रायलचे युद्ध याचा फायदा घेऊन एखाद्या वेळेला चीन आता तैवानवरती हल्ला करेल. म्हणून अमेरिकेचे लक्ष हे तैवानला सुरक्षित करण्यामध्ये केंद्रित झालेले आहे.
एवढेच नव्हे तर नंबर तीनची महाशक्ती युरोपसुद्धा सध्या प्रचंड अस्वस्थ आणि कठीण परिस्थितीतून जात आहे, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकचा खेळ सुरू असताना तिथे सायबर हल्ले केले जात आहेत आणि अराजकता माजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. युरोपमध्ये प्रस्थापित सरकारे बदलत आहे आणि येणार्या निवडणुकांमुळे युरोपचे लक्ष त्यांच्यासमोर असलेल्या आर्थिक बाबीवर आहे. काश्मीर हा त्यांच्याकरिता महत्त्वाचा मुद्दा नाही. यामुळे काश्मीरमध्ये काय चालले आहे, यावरती जगाचे फारसे लक्ष नाही. आता जगातली कुठलीही महाशक्ती पाकिस्तानला दहशतवाद थांबवा, हे सांगायला तयार नाही. पाकिस्तानकडे दहशतवाद वाढवण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यांचे अर्धे सैनिक पाकिस्तानच्या आत चाललेल्या बलुचिस्तान किंवा ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ विरोधातील दहशतवादीविरोधी अभियानामध्ये गुंतलेले आहेत. म्हणून पाकिस्तानला काश्मीरमध्ये हिंसाचार वाढवून पाकिस्तानी जनतेचे लक्ष काश्मीरकडे वळवायचे आहे.
सर्वात महत्त्वाचे मग करायचे काय? अर्थातच भारतीय सैन्याने जम्मू-उधमपूर भागामध्ये अतिरिक्त सैन्य आणि स्पेशल फॉर्सेस तैनात केले आहेत, ज्यामुळे येणार्या काळात दहशतवादी विरोधी अभियानाला वेग मिळेल. आत घुसलेले ५०-६० दहशतवादी जिवंत नक्कीच परत जाणार नाही, यात शंका नको. परंतु, ही झाली संरक्षणात्मक कारवाई. यानंतरसुद्धा वाटले तर पाकिस्तान पुन्हा दहशतवादी काश्मीरमध्ये घुसवू शकतो. म्हणून पाकिस्तानच्या विरोधात आक्रमक कारवाई जरुरी आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचे नुकसान केले जावे.
पाकिस्तानी सैन्यावर बलुचिस्तान आणि ‘तेहरिक-ए-तालिबान’च्या मदतीने हल्ले करून त्यांचे नुकसान केले जावे. पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये तोफखान्याचा वापर किंवा क्षेपणास्त्रांचा वापर किंवा हवाई दल, नौदलाचा वापर किंवा स्पेशल फोर्सेसकडून ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे अनेक उपाय उपलब्ध आहेत आणि त्यामधून कुठला उपाय वापरायचा हे ठरेलच. परंतु, पाकिस्तानकरिता एक राजकीय संदेशसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे की, भारतातील सारे राजकीय पक्ष आणि पूर्ण देश पाकिस्तान विरोधात कारवाई करण्याकरिता भारतीय सैन्याच्या मागे उभा आहे. पाकिस्तानला धडा शिकवावा, अशा प्रकारचा ठराव जर लोकसभेत एकमताने पारित केला गेला, तर पाकिस्तानला आणि पर्यायाने चीनलासुद्धा एक मेसेज मिळेल की, भारतीय एकत्रितरित्या पाकिस्तानी पुरस्कृत दहशतवादाचा मुकाबला करण्याकरिता तयार आहेत.