केंद्र सरकार वायनाडच्या पाठिशी, सर्वतोपरी मदत सुरू - पंतप्रधान नरेंद्र मोदी

    10-Aug-2024
Total Views |

Narendra Modi Waynad
 
नवी दिल्ली, दि. १० : विशेष प्रतिनिधी केंद्र सरकार वायनाडच्या (Wayanad Landslides) पाठिशी असून पिडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील वायनाड येथे दाखल झाले होते. यावेळी त्यांनी भुस्खलनपिडीतांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि राज्यपाल मोहम्मद आरिफ यांच्यासोबत भुस्खलन झालेल्या भागास भेट देऊन पिडितांचीही विचारपूस केली.
 
पंतप्रधान म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांच्याशी तत्काळ चर्चा केली होती, मुख्यमंत्र्यांना त्यावेळीच केंद्र सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी, पोलीस, डॉक्टर आणि सर्वांनी लवकरात लवकर पीडितांना मदत करण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेमध्ये बळी गेलेल्या कुटुंबियांच्या पाठिशी केंद्र सरकार ठामपणे उभे आहे. त्याचप्रमाणे केरळ सरकारलाही केंद्र सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
 
आपण आपत्ती अतिशय जवळून अनुभवली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, सुमारे ४५-४७ वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी येथील एक धरण अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मोरबी शहरात पाणी शिरून संपूर्ण शहरात 10-12 फूट पाणी साचले होते. यामध्ये 2,500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. जवळपास सहा महिने आपण स्वयंसेवक म्हणून तेथे काम केले होते. त्यामुळे केंद्र सरकार आपत्तीग्रस्त लोकांच्या मदतीसाठी कोणतीही कसर सोडणार नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.
 
आपत्ती स्थळाला भेट देण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी वायनाडमध्ये हवाई पाहणी केली. हवाई पाहणीत त्याला भूस्खलनाचे उगमस्थान सापडले, जे इरुवाझिंजी पुझा (नदी) च्या उगमस्थानी आहे. त्यांनी पुनचिरीमट्टम, मुंडक्काई आणि चुरलमाला या सर्वाधिक बाधित भागांचीही पाहणी केली. पंतप्रधानांनी वेल्लारमाला येथील जीव्हीएचएस शाळेस भेट दिली. कालपेट्टानंतर पंतप्रधानांनी रस्त्याने भूस्खलनग्रस्त भागात जाऊन बचावकार्याची माहिती घेतली. त्यांनी मदत छावण्या आणि रुग्णालयांमध्ये पीडितांची भेट घेतली. पंतप्रधानांनी बचाव मोहिमेदरम्यान भारतीय लष्कराने बांधलेल्या चुरलमला येथील 190 फूट लांबीच्या बेली ब्रिजलाही भेट दिली.