मुंबई : मराठी चित्रपट, नाट्यसृष्टी ८०-९० च्या दशकात गाजवणारे विनोदवीर ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज १० ऑगस्ट रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. आज दुपारी विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मराठी कलाविश्वातून कलाकारांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.
दरम्यान, अभिनेते प्रशांत दामले यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांच्या भावना व्यक्त करत विजय कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. “ही दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे. तसा तो आजारी होता. पण इतक्या लवकरच निधन होईल असं वाटतं नव्हतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो. पहिल्यांदाच मला अभिनय शिकण्याची संधी त्याच्याकडेच मिळाली. १९८३मध्ये मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांची जोडी सुपरहिट होती. त्यांना बघत बघत आम्ही शिकत होतो. मी असो विजय चव्हाण असो, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आम्ही लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम यांना बघून शिकत होतो. विजय कदम खूपच भारी होता. त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअॅक्शनची स्टाइल छान होती. मुळात तो सहाय्यक कलाकारांना खूप पाठिंबा देणारा कलाकार होता. तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे.”