निवडणूक फंडासाठी उबाठाची उठाठेव! अब्जावधींचा घोटाळा करणाऱ्या गुप्ताची घेतली भेट
खासदार नरेश म्हस्के यांचा गौप्यस्फोट
10-Aug-2024
Total Views |
मुंबई : दक्षिण अफ्रिकेत अब्जावधींचा रॅण्ड घोटाळा करणाऱ्या गुप्ता बंधूंपैकी एक जण दिल्लीत आला होता, या गुप्ताची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
दक्षिण आफ्रिकेत गुप्ता बंधू यांनी अब्जावधी रुपयांचा रॅण्ड घोटाळा केला आहे. याप्रकरणातील एक आरोपी गुप्ता दिल्लीत आला होता, त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी त्याची अर्धा तास भेट घेतली असल्याची माहिती आपल्याकडे आहे, असा दावा नरेश म्हस्केंनी केला आहे.
तसेच गुप्ता आणि उध्दव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही असून यात हा प्रकार उघड होईलच. त्यामुळे याची तपास यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सत्ता गेल्यामुळे उध्दव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना? असा संशयही म्हस्केंनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, "राऊतांच्या बंगल्यात ७ तारखेला संध्याकाळी काळ्या काचेच्या गाडीतून कोण आलं होतं? वादग्रस्त गुप्ता बंधूना उध्दव ठाकरे नक्की कशासाठी भेटले? याचा उलगडा जनतेसमोर झाला पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली.
संजय राऊत मध्यस्थी!
मला मुख्यमंत्रीपद द्या, अशी भीक उद्धव ठाकरें काँग्रेस हायकामांडकडे मागितली. यासाठीच त्यांचा तीन दिवसीय लोटांगण दिल्ली दौरा पार पडला. पण काँग्रेसने त्यांना हूसकावून लावले आहे. दिल्लीत त्यांना कुणीही भाव दिला नाही, अशी टिकाही खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच राष्ट्रवादीच्या एका नेत्यालाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे यात उध्दव ठाकरेंचा अडसर ठरू नये म्हणून त्यांना अडकवण्यासाठी संजय राऊतांनीच गुप्ता बंधूंची भेट घडवून आणलेली नाही ना? असा सवालही म्हस्केंनी यावेळी उपस्थित केला.