मराठा क्रांती ठोक मोर्चाची "मातोश्री"बाहेर निदर्शने
31-Jul-2024
Total Views | 45
मुंबई : उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करीत मंगळवार, दि. ३० जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर निदर्शने केली. आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे हा मुद्दा आणखी चिघळल्याने विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे.
परंतु, मविआतील सर्व घटकपक्ष संभ्रमाची भूमिका घेत असल्यामुळे मराठा आंदोलकांनी थेट उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या दिला. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे मातोश्रीबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आग्रही होते.
मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेकडो पोलिसांनी त्यांना कला नगरमध्ये जाण्यापासून रोखले. अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला भेटीचे निमंत्रण दिले.
त्यानुसार, रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली चार जणांचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरेंना यांना भेटले. सर्वपक्षीय नेते आमच्याकडे मतांसाठी आले होते. पण आज मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचल्यावर ठाकरे आम्हाला भेटायला तयार नाहीत. आम्ही शरद पवार, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरही आंदोलन करू.