"उद्धव ठाकरे नाक्यावरच्या..."; दरेकरांचा खोचक टोला
31-Jul-2024
Total Views |
मुंबई : देवेंद्र फडणवीसांचा द्वेष असल्याने उद्धव ठाकरे नाक्यावरच्या भांडणासारखे बोलत आहेत, असा खोचक टोला भाजप नेते प्रविण दरेकरांनी लगावला आहे. बुधवारी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केली. यावर आता दरेकरांनी प्रत्युत्तर दिले. ते टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
प्रविण दरेकर म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचं आव्हान अत्यंत पोकळ आहे. देवेंद्रजींनी समर्थपणे महाराष्ट्राचं राजकारण केलेलं आहे. त्यांनी पाच वर्ष उत्तम मुख्यमंत्री म्हणून काम केलं. आता दोन्ही पक्षांना सोबत घेऊन जनतेच्या हितासाठी सरकार चालत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना देवेंद्रजींविषयी कमालीचा द्वेष आणि मत्सर आहे. यातूनच अधूनमधून त्यांच्या भावना उफाळून येत असतात. देवेंद्रजींवर द्वेष आणि मत्सराने बोलल्याशिवाय त्यांच्या मनाचं समाधान होत नाही. त्यामुळे ते अशा सभांमधून हा राग भागवून घेतात. परंतू, देवेंद्रजी कधीच व्यक्तीश: नाक्यावरचं भांडण असल्यासारखं बोलत नाहीत. ते महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणी आहेत. पण उद्धव ठाकरेंची भाषा ही महाराष्ट्राच्या पगल्भ राजकारणाला शोभा देणारं नाही," असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेवर बोलताना दरेकर म्हणाले की, "उद्धव ठाकरेंचं वक्तव्यच गुर्मीत आहे. त्यामुळे जो गुर्मीत बोलतो त्यांनी गुर्मी उतरवण्याची भाषा करु नये. ते पराभवात यश मानून ढोल पिटण्याचं काम करत आहेत. मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले ही वस्तुस्थिती मानायला ते तयार नाहीत," असेही ते म्हणाले.