नागपूर : विजयभाऊ आणि नाना भाऊ यांच्यात भाऊ भाऊ आणि एकमेकांना फाडून खाऊ, असं सुरु आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष देशमुखांनी केला आहे. तसेच त्या दोघांमध्ये अजिबात पटत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
आशिष देशमुख म्हणाले की, "विजयभाऊ आणि नाना भाऊ या दोघांना आता फक्त खुर्चीचे स्वप्न आहे. त्यामुळे सध्या विदर्भात 'भाऊ-भाऊ पण एकमेकांना फाडून खाऊ' असं सुरु आहे. आज विदर्भ काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते आणि प्रदेशाध्यक्षांचं अजिबात पटत नाही, अशी खुलेआम चर्चा आहे." असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "तिकीट वाटपासाठी ते एकमेकांना फाडून खाण्यापर्यंत तयार झाले आहेत. याऊलट महायूती सरकार हे महिलांना आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य सरकार एक मोठा भाऊ म्हणून जनतेच्या मदतीला धावून आले आहे. त्यामुळे महायूतीच्या माध्यमातून भाजपने महाराष्ट्रात एक लोकाभिमूख सरकार दिलेलं आहे," असेही ते म्हणाले.