मुंबई : जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांना देण्यात आलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेवरून खासदार संजय राऊत आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना कोणकोणत्या नेत्यांच्या कुटुंबीयांना विशेष सुरक्षा पुरवण्यात आली, याचा विसर त्यांना पडलेला दिसतो. मविआच्या काळात विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करून, ती उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्यात आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई यांचाही समावेश होता.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना, राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्यात आली. या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. देवेंद्र फडणवीस यांना असलेली झेडप्लस सुरक्षा कमी करून वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली. तर, राज ठाकरेंची झेड सुरक्षा काढून त्यांनाही वायप्लस एक्स्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली.
आशिष शेलार यांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. विशेष म्हणजे कोणत्याही पदावर नसलेल्या वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली. तर, त्यावेळ नगरविकास मंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांना वारंवार धमक्या मिळून देखील झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली होती.
वरुण सरदेसाई उद्धव ठाकरेंचा सरकारी भाचा
समीत कदम यांना दिलेल्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वरुण सरदेसाईला शासकीय सुरक्षा का दिली होती, तो कोण आहे? याचे उत्तर द्यावे. उद्धव ठाकरेंचा सरकारी भाचा, ही ओळख सोडल्यास त्याची काहीच पात्रता नाही.