अर्थसंकल्पानंतरच्या पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
24-Jul-2024
Total Views | 188
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ सादर झाल्यानंतर आज पहिल्याच दिवशी इंधनांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून खनिजांवरील एक्साईज ड्युटी कमी केली असून त्याचाच परिणाम म्हणून इंधन दरासह खनिजांच्या किंमतीदेखीत कमी झाल्या आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लीटर ९४.७२ रुपये तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल १०४.२१ रुपये तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.
दरम्यान, बजेट सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, इंधनाच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता. त्यानंतर आता पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. बजेटच्या आधी आर्थिक पाहणी अहवालात अलीकडच्या वर्षांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या आहेत.
सर्वेक्षणात म्हटले आहे की, केंद्राने सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींपासून दूर ठेवण्यासाठी इतर अनेक पावले उचलली जात आहेत. क्रूड आयात ऑईल बॅरेलमध्ये विविधता आणणे, पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विंडफॉल कर, पेट्रोल आणि डिझेलची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सार्वत्रिक सेवा बंधनाच्या तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून ईव्ही वाहनांना प्रोत्साहन मिळत असताना देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कात कपात केली असून इंधन, कमोडिटीज बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. वर्ष २०२३ मध्ये जागतिक वस्तूंच्या किमती कमी झाल्यामुळे ऊर्जा, धातू, खनिजे आणि आयातीमधील चलनवाढीच्या साखळीतून कृषी वस्तूंच्या किंमतीवरील दबाव कमी झाल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.