नवी दिल्ली : वाराणसी येथील काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या धर्तीवर विविध धार्मिक कॉरिडॉरची उभारणी करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गया येथील विष्णुपद मंदिर आणि बिहारमधील बोधगया येथील महाबोधी मंदिराचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. "विष्णुपद मंदिर कॉरिडॉर आणि महाबोधी मंदिर कॉरिडॉर यांना यशस्वी काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडॉरप्रमाणे जागतिक दर्जाची तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित करण्यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक विकासाला सहकार्य केले जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
राजगीरचे हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठी खूप धार्मिक महत्त्व आहे आणि जैन मंदिर संकुलातील 20 वे तीर्थंकर मुनिसुव्रत मंदिर प्राचीन आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की सप्तर्षी किंवा 7 उष्णतेचे झरे एक पवित्र असे उबदार पाण्याचे ब्रह्मकुंड तयार करतात.राजगीरच्या विकासासाठी सर्वसमावेशक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
केंद्र सरकार नालंदाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच नालंदा विद्यापीठाला त्याच्या गौरवशाली उंचीवर नेण्यासाठी मदत करेल.तसेच ओडिशाचे निसर्गसौंदर्य, मंदिरे, स्मारके, कलाकुसर, वन्यजीव अभयारण्ये, नैसर्गिक लँडस्केप आणि प्राचीन समुद्रकिनारे हे एक अप्रतिम पर्यटन स्थळ बनवतात. आमचे सरकार त्यांच्या विकासासाठी मदत करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले.