नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात करदात्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर प्रणालीमध्ये मानक कर कपात ७५,००० रुपये करण्यात आली आहे. पूर्वी मानक कर कपात ५०,००० रुपये होती. सरकारच्या या घोषणेमुळे नवीन कर प्रणालीच्या करदात्यांना याचा लाभ होणार आहे. नवीन प्रणाली स्वीकारलेल्या करदात्यांनी या नवीन नियमांचा लाभ घेतल्यास त्यांची १७,५०० रुपये बचत होईल.
त्यासोबतच जुन्या कर प्रणालीसाठी मानक कर कपातीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. नवीन कर स्लॅबमध्ये बदल करण्यात आले असून जुन्या करप्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आता नव्या करप्रणालीत ३ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. त्याचबरोबर ३ ते ७ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के कर भरावा लागेल.
७ ते १० लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर १० टक्के आणि १० ते १२ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर १५ टक्के कर लागणार आहे. त्याचप्रमाणे १२ ते १५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर २० टक्के आणि १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के कर लागणार आहे.
अर्थसंकल्पात, नवीन कर प्रणाली अंतर्गत कौटुंबिक पेन्शनमधून कपात २५,००० रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यापूर्वी ही वजावट १५,००० रुपये होती. त्याच वेळी, आयकर कायद्याच्या कलम ८० सीसीडी मध्ये, गैर-सरकारी नियोक्त्यांच्या संदर्भात कपातीची रक्कम १० टक्क्यांवरून १४ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली होती.