मुंबई : शरद पवारांनी सोमवार, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्दावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी २ वाजताच्या दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवारांची ही बैठक पार पडली.
आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती सरकारने ९ जुलै रोजी सह्याद्री अतिथिगृहावर सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला येण्यासंदर्भात शेवट्या क्षणापर्यंत अनुकूल असलेल्या महाविकास आघाडीने सायंकाळी सहा वाजता एक पत्र लिहून बैठकीला येणार नसल्याचं कळवलं.
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झाल्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी स्वत: लक्ष घालावं, अशी विनंती केल्याचं भुजबळांनी सांगितलं. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंशी बोलून चर्चा करण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं. त्यानंतर आता शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच या भेटीत राज्यातील दूध दरवाढी संदर्भातही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.