"जरांगेंनी मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नये"

भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन

    21-Jul-2024
Total Views |
 Manoj Jarange
 
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर त्यांनी खुली राजकीय भुमिका घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिले आहे. तसेच मराठा समाजाच्या भावनांचा राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले आहे.
 
माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर टीका करायचे काही कारणच नाही. त्यांनी अलीकडच्या काळात ज्या प्रकारची भाषा सुरू केलीय ती त्यांनाच लखलाभ होवो. त्यांचा आणि माझा कलगीतुऱ्याचा सामना नाही. माझे एवढेच माफक म्हणणे आहे की, मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी सर्व पक्षांतील मराठा समाजाचे नेते, आमदार समाजासोबत आहेत. परंतु अलीकडच्या काळात जरांगेंची भुमिका राजकारणासारखी वाटतेय.
 
कारण जरांगे ओबीसीतून आरक्षण द्या म्हणतात. शरद पवारांना त्यांच्या भूमिकेबाबत विचारत नाही, ओबीसीतून आरक्षण द्यायला उद्धव ठाकरेंची तयारी आहे का? हेही विचारत नाहीत. काँग्रेसच्याही बाबतीत तीच भुमिका आहे. तुमचे देवेंद्र फडणवीस, महायुती सरकार हेच लक्ष्य आहे की मराठ्यांचा प्रश्न हे लक्ष्य आहे, असा सवालही दरेकरांनी यावेळी केला.
 
दरेकर पुढे म्हणाले की, तुमच्या सगळ्या विषयासंदर्भात सरकार सकारात्मक आहे. तुमचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नाहीना, मुख्यमंत्री स्वतः संवेदनशील आहेत. त्यांचे मंत्री आपल्याकडे येताहेत त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा. या प्रश्नांसंदर्भात आम्ही तुमच्या सोबत आहोत. फक्त राजकारण करू नका एवढीच आमची मागणी आहे. आंतरवली सराटी येथे छत्रपतींच्या पुतळ्याखाली बसणार आणि प्लॅनींग काय करणार कुणाला पाडायचे, कुणाला उभे करायचे. म्हणजे तुम्ही पूर्णतः राजकीय झालात मग राजकीय भुमिका घ्या, अशी टिकाही दरेकरांनी केली.
 
दरेकर पुढे म्हणाले की, मराठा समाजातील तरुण तरुणींचे अश्रू आम्ही नेहमीच पुसत आलोय. आम्ही मराठा समाजासाठी १५-२० वर्ष तरुण-तरुणींसाठी काम करतोय. प्रत्येक वेळेला समाजाच्या तरुण-तरुणींच्या मागे ठाम उभे राहिलोय. तुम्ही फक्त भावनिक करून मराठा समाजाला राजकारणात ओढू नका. आंदोलनाची भुमिका नीट ठेवा. आम्ही सोबत आहोत. सरकारकडे आम्ही आपले दूत म्हणून काम करू. तुमच्या भूमिकेला आता राजकीय वास यायला लागला आहे. तसे असेल तर खुली राजकीय भुमिका घ्या. मराठा समाजाच्या भावनांचा अशा प्रकारे राजकारणासाठी वापर करून घेऊ नका, असे आवाहनही दरेकर यांनी जरांगेंना केले.
 
आमची स्पष्ट भुमिका मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आहे. नव्हे ते दिलेय. ते कोर्टात टिकविण्याची हमीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलीय. ओबीसीतून आरक्षण देऊ शकत नाही हे माहित आहे. सगेसोयरेसंदर्भात प्रक्रिया सुरू असून आलेल्या हरकतींवर अभ्यास सुरू आहे. सरकार डोळे मिटून गप्प नाही. हा प्रश्न सुटायला नको तो धगधगत राहायला पाहिजे, त्या जीवावर राजकीय पोळी भाजता येते का? हा तुमचा फोकस झालाय याचा आम्हाला दुःख आहे. भोळ्याभाबड्या मराठा समाजाच्या भावनांचे राजकीय दुकान मांडू नका ही अपेक्षा आहे. बाकी आम्ही जरांगे यांच्यासोबत आहोत, त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत आम्हाला आदर आहे. पण त्यांचा कुणी वापर करू नये, त्यांच्या मार्फत कुणाचा अजेंडा राबविला जाऊ नये, एवढेच म्हणणे असल्याचेही दरेकरांनी म्हटले.
 
उद्धव ठाकरेंनी जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण घालवले
देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. त्यांची भाषा मराठा समाजाच्या बाजूने आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. उद्धव ठाकरेंच्या सरकारला टिकवता आले नाही. कारण एका ब्राम्हण समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले तर मराठा समाजाची दुकानदारी करणाऱ्यांचे काय होणार हा विषय लक्षात घेऊन अडीच वर्ष फडणवीसांनी दिलेले आरक्षण कसे फेल जाईल म्हणून कोर्टात वकील उभा राहिला. जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण उद्धव ठाकरेंनी घालवले, असा आरोपही दरेकरांनी केला.