रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प ; २ परिशिष्टे प्रसिद्ध

अनेक घर बंद असल्याने अपात्रांचा आकडा मोठा १६ हजार ५७५ पैकी ७ हजार ५२९ रहिवासी पात्र

    20-Jul-2024
Total Views |
ramai Slum
 
मुंबई : घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात येणार असून माता रमाबाई आंबेडकर नगरमधील १६ हजार ५७५ पैकी केवळ ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. उर्वरित रहिवाशांना पात्रता निश्चिती करण्यासाठी पुढील दोन महिन्यात कागदपत्रे सादर करता येणार आहे. त्यानंतर पात्र रहिवाशांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (एसआरए) अधिकाऱ्यांनी दिली.
 
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) पूर्वमुक्त मार्गाचा विस्तारीकरण प्रकल्प हाती घेणार आहे. एमएमआरडीएकडून रमाबाई आंबेडकरनगर येथील ३३.१५ हेक्टर जागेचा विकास करून तेथील अंदाजे १४,२५७ झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) यांच्या माध्यमातून हे पुनर्वसन केले जाणार आहे.
 
सद्यस्थितीत एसआरएच्या माध्यमातून या भागातील बाधित झोपड्यांचे सर्वेक्षण, रहिवाशांची पात्रता निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार पात्रता निश्चितीची जबाबदारी झोपुवर असून झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून दोन वेळा परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर या प्रकल्पासाठी वास्तुविशारद नेमण्याची प्रक्रिया एमएमआरडीए सुरू केली आहे. यासाठी वास्तूविशारद नेमणूकीसाठी मागविलेल्या निविदांना तीन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यातील लघुतम निविदा सादर केलेल्या सल्लागाराला काम देण्याची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे.
 
झोपुने आधी विस्तारीकरण प्रकल्पात थेट बाधित होणाऱ्या १६९४ रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण करून परिशिष्ट २ प्रसिध्द केले होते. यात १०२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. तर गुरुवारी दुसरे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार ६ हजार ५०० रहिवासी पात्र ठरले आहेत. एकूण ७ हजार ५२९ रहिवासी पात्र ठरले आहेत. मोठ्या संख्येने रहिवाशी अपात्र ठरले आहेत. आतापर्यंत १,५०० रहिवाशांबरोबर करार करण्यात आले आहेत.
 
एमएमआरडीएकडून या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी घरभाडे दिले जाणार आहे. मात्र अपात्र नावांपैकी काही जणांची घरे बंद असल्याने त्यांचे सर्वेक्षण होऊ शकले नाही. अशा घरांचे सर्वेक्षण करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. तर अपात्रांना अपीलाची संधी असणार आहे. त्यामुळे पात्र रहिवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती झोपू प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.