जगातील सर्वात जुनी कॉमरेड मॅरेथॉनमध्ये धावला मुंबईकर!
02-Jul-2024
Total Views |
मुंबई : शहरातील बेडेकर सदन येथील रहिवाशी अभिषेक सबनीस यांनी जगातील सर्वात जुनी व नावलौकिक असलेली कॉमरेड मॅरेथॉन दक्षिण आफ्रिका (८५ कि.मी.) या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या गिरगावचे नाव गाजवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, सबनीस यांनी प्रथमच या मॅरेथॉनमध्ये भाग घेत निर्धारित वेळेत म्हणजेच ११.५१ तासांमध्ये शर्यत पूर्ण केली आहे.
दरम्यान, लोकमान्य गणेश मंडळ (बेडेकर सदन, शांताराम चाळ आणि मालिनी ब्लॉक) यांनी दि. ३० जून, २०२४ रोजी बेडेकर सदनच्या पटांगणात अभिषेक सबनीसची मुलाखत आणि कौतुक समारंभ कार्यक्रम ठेवला होता. यावेळी सबनीस यांची मुलाखत पद्मजा बापये यांनी घेतली. तर त्यांचे कौतुक करण्यासाठी 'वि पी बेडेकर अँड सन्स प्रा. लि.' चे संस्थापक वसंत बेडेकर आणि पिंकाथॉनची राजदूत क्रांती साळवी (गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर) यांना आमंत्रित केले होते.
विशेष म्हणजे सबनीस यांनी मॅरेथॉनचे अनुभव, ट्रैनिंग दरम्यान त्यांच्यात झालेले मानसिक आणि शारीरिक बदल, त्यांच्या प्रशिक्षकाची साथ आणि शिकवणी, कुटुंब आणि मित्र मैत्रिणींचे सतत प्रोत्साहन आणि शर्यती दरम्यान आलेल्या अडचणी दूर करून ही मॅरेथॉन यशस्वीरीत्या पार पाडली हे नागरिकांसमोर उलगडून सांगितले. दरम्यान, धावपटू सबनीस यांचे 'पिंकाथॉन'च्या राजदूत क्रांती साळवी यांनी अभिनंदन केले.
दि. ०१ जुलै हा जगभरात चार्टर्ड अकाउंटंट आणि डॉक्टर्स डे साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर वाडीतील चार्टर्ड अकाउंटंट - गौरी बेडेकर, श्वेता छेडा, गौरव कडू, धीरेन छेडा, सागर कवळे, केतकी चाचर आणि डॉक्टर्स - डॉ कमलेश पंड्या, डॉ उज्वला सराफ यांचा देखील सम्मान करण्यात आला आहे.