नव्या मुंबईत जखमी समुद्र पक्ष्यांची रीघ; मृत्यूचे प्रमाण अधिक

    19-Jul-2024
Total Views |
pelagic birds


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरात पावसाचा जोर वाढल्यापासून खोल समुद्रामध्ये अधिवास करणारे समुद्री पक्षी किनारी भागांमध्ये वाहून येण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे (pelagic birds). नवी मुंबईत आणि वसई परिसरात लेसर नाॅडी, ब्राऊन नाॅडी या समुद्री पक्ष्यांचे दर्शन झाले आहे (pelagic birds). यामधील लेसर नाॅडी पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. (pelagic birds)
 
 
 
समुद्री पक्षी हे खोल समुद्रामध्ये अधिवास करण्यासाठी ओळखले जातात. समुद्रातील बेटांवरच ते प्रजनन करुन अंडी घालतात. हे पक्षी फार क्वचितच किनारी क्षेत्रांमध्ये आढळतात. मात्र, समुद्रातील वादळे आणि पावसाळ्यातील जोरदार वाऱ्यांमुळे हे पक्षी किनारी क्षेत्रांमध्ये फेकले जातात. किनारपट्टी भागात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा फटका अशाच काही खोल समुद्रामध्ये अधिवास करणाऱ्या समुद्री पक्ष्यांना बसला आहे. यामधील काही पक्षी हे मुंबईच्या समुद्राकिनाऱ्यांवर जखमी अवस्थेत आढळून आले आहेत. दोन दिवसांपूर्वी बेलापूर येथे लेसर नाॅडी प्रजातीचा पक्षी जखमी अवस्थेत सापडला होता. त्याच्या बचाव केल्यानंतर तो मृत पावला. शुक्रवार दि. १९ जुलै रोजी देखील बेलापूर सेक्टर ७ मध्ये लेसर नाॅडी पक्षी आढळून आला. वन विभागाने त्याला रेस्क्यू केले. मात्र, उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत या पक्ष्याच्या मृत्यू झाल्याची माहिती कांदळवन कक्षाचे वनपरिक्षेत्र अधिकारी (नवी मुंबई) सुधीर मांजरे यांनी दिली. लेसर नाॅडी हा पक्षी प्रामुख्याने भारताच्या दक्षिणेला असणाऱ्या हिंद महासागरातील सी-शेल्स किंवा मालदीव येथील बेटांवर घरटी बांधतो. प्रामुख्याने हा खोल समुद्रात आढळणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. याशिवाय वसईच्या किनाऱ्यावर डाॅ. रजनीश घाडी यांना ब्राऊन बूबी पक्ष्याचे दर्शन झाले आहे. तर शुक्रवारी सायंकाळी वसईमधूनच लेसर नाॅडी पक्षी जखमी अवस्थेत सापडला.
 
 
 
सूटी टर्न, ब्राइडल्ड टर्न, ब्राऊन नाॅडी, व्हेड्जे-टेलड् शेअरवाॅटर सारखे समुद्री पक्षी मुंबईच्या किनारी क्षेत्राबरोबरच पुण्यापर्यंत फेकले गेले आहेत. यामधील जखमी समुद्री पक्ष्यांना वन्यजीव बचाव कार्यकर्त्यांनी वाचवले आहे. मात्र, बचावानंतर हे पक्षी मृत झाल्याच्या नोंदी अधिक आहेत. याविषयी पक्षीतज्ज्ञ पशुवैद्यक डाॅ. शिवानी तांडेल यांनी सांगितले की, "समुद्रीपक्षी जेव्हा अशक्त होतात, तेव्हाच ते जोरदार वाऱ्याच्या वेगाबरोबर जमिनीच्या दिशेने फेकले जातात. जमिनीवर धडकल्यानंतर त्यांच्यासाठी हा परिसर नवखा असल्याने ते तणावपूर्ण परिस्थितीत जातात. अशा परिस्थितीत त्यांनी हाताळल्यास आणि त्यांना योग्य उपचार न मिळाल्यास त्यांचा मृत्यू होतो."