देशाचे भवितव्य घडविणारा ’गुरुजीचा फोन’

    19-Jul-2024
Total Views |
gurujicha phone shortfilm


शिक्षकांना घाबरून शाळेत जायला तयार न होणारी मुले आपण अनेकदा आजूबाजूला पाहतो; पण शिक्षकांनी फक्त एक फोन केल्यावर मुले शाळेत येऊ लागली तर...? शिक्षकांच्या एका फोनवर लगेच शाळेची वाट धरणार्‍या अशाच मुलांची गोष्ट आपल्यासमोर मांडतो, ‘गुरुजीचा फोन’ हा लघुपट. दि. 6 जुलै रोजी प्रदर्शित झालेला हा लघुपट माध्यमांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तेव्हा, उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आजच्या काळातील गुरु-शिष्य संबंधांचे अनोखे दर्शन घडविणार्‍या या लघुपटाविषयी...

ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये ‘वाहोली मराठी’ या शाळेत शिकवणारे शिक्षक करणसिंह राजपूत. ते मुलांना शाळेत येण्यासाठी फक्त एक फोन करतात आणि त्यांच्या या एका फोनमुळे सर्व विद्यार्थी आनंदाने शाळेत हजेरीही लावतात. करणसिंह राजपूत यांनी ही कथा आपला मित्र अजय लिंबाजी पाटील यांना सांगितली आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत घडलेल्या या घटनेने अजय पाटील यांना हा लघुपट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. अजय पाटील यांनी या लघुपटाचे पटकथालेखन आणि दिग्दर्शन केले आहे, तर आदर्श पाटील यांनी छायाचित्रीकरण आणि आकाश पाटील यांनी लघुपटाचे संकलन केले आहे. मुख्य म्हणजे, कल्याणमधील ‘ठाकराचा पाडा’ या आदिवासी पाड्यात राहणार्‍या आणि याच पाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी या लघुपटात उत्तम अभिनय केला आहे. अवघा साडेसहा मिनिटांचा हा लघुपट गुरु-शिक्षकांचे नाते, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेविषयी बरेच काही सांगून जातो.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थी हे सामान्यपणे आसपासच्या गावांत, पाड्यांतच राहणारे. अनेकदा गावात किंवा गावाच्या आसपास जिल्हा परिषदेची शाळा सोडून दुसरी कुठलीच शाळा नसते आणि जरी दुसरी एखादी खासगी शाळा असली, तरी त्या शाळेची फी भरणे, शालेय सामग्रीसाठी लागणारा खर्च करणे पालकांना शक्य होईलच असे नाही. त्यामुळे मग मुलांना या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाठवले जाते. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयी-सुविधा कमी असतात, पण कमीतकमी सोयी-सुविधा असतानाही अधिकाधिक मेहनत करून यशप्राप्तीचे जे धडे या शाळांमध्ये मिळतात, ते कित्येक पटींनी अधिक मौल्यवान ठरावे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षणाची जरी सोय असली, तरीही बरेचदा परिस्थितीमुळे ते मोफत शिक्षणही खूप कष्ट करून मिळवावे लागते. आई-वडील कामावर जात असतील तर घरातील लहान भावंडांना सांभाळणे, गरज पडली तर आईवडिलांना घरच्या आणि शेतीच्या कामात मदत करणे, अशी अनेक प्रकारची तारेवरची कसरत सांभाळून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असतात. शिक्षणापासून दूर नेणार्‍या अशा बिकट परिस्थितीमुळेच कदाचित या मुलांच्या मनात शिक्षणाविषयी अधिक ओढ निर्माण होत असावी. त्यामुळेच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकून मोठमोठ्या पदांवर कार्यरत व्यक्तींची असंख्य उदाहरणे सापडतात. शिक्षणाविषयीची हीच ओढ या लघुपटातील मुलांमध्येही प्रकर्षाने पाहायला मिळते आणि त्यामुळेच ही मुले ही गुरुजींचा एक फोन आल्यावर लगेच शाळेत धावत सुटतात.

या लघुपटाचे चित्रीकरण ‘ठाकराचा पाडा’ या पाड्यातच झाल्यामुळे, या मुलांना नेमके कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते, याचे प्रभावी दर्शन आपल्याला हा लघुपट घडवतो. एकीकडे जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण मिळवण्यासाठी धडपडणारी ही मुले आणि दुसरीकडे त्याच जिद्दीने आणि चिकाटीने या मुलांना परिपूर्ण शिक्षण मिळावे, त्यांना जमेल तितके ज्ञानदान करता यावे, यासाठी झगडणारे शिक्षक ही या जिल्हा परिषदेच्या शाळांची खरी संपत्ती. आज अनेक शिक्षक नोकरी मिळवताना, जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळांकडे अधिक आकर्षिले जातात. खासगी शाळांमध्ये शिक्षकांना मिळणार्‍या सेवा-सवलती या तुलनेने अधिक चांगल्या आहेत, असे मत तयार असताना अगदी आनंदाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आनंदाने नोकरी स्वीकारणारे शिक्षक थोडे का होईना , पण शिल्लक आहेत, हे आपल्या देशाचे सुदैव.

ज्यांच्यासोबत या लघुपटातील घटना प्रत्यक्षात घडली, ते करणसिंह राजपूत आणि लघुपटाचे दिग्दर्शक अजय लिंबाजी पाटील हे सुद्धा याच शिक्षकांपैकी एक. करणसिंह राजपूत यांच्या एका फोनवर मुले आनंदाने शाळेत गेली, यावरून त्यांनी त्या मुलांच्या मनात शिक्षकांविषयी, शाळेविषयी आणि शिक्षणाविषयी किती प्रेम आणि आदर निर्माण केला असेल आणि ते निर्माण करण्यासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असेल, याची कल्पना येते. शिक्षक आणि दिग्दर्शक अजय पाटील यांनाही ही गोष्ट जगासमोर मांडावीशी वाटली आणि ते सुद्धा या मुलांनाच अभिनयाची संधी देऊन! यावरून त्यांच्या मनात या मुलांविषयीची आस्था आणि कळकळ लक्षात यावी. अजय पाटील यांना लेखक व्हायचे होते, पण त्यांच्या आईच्या इच्छेखातर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. पण, शिक्षक झाल्यानंतर त्यांनी आपल्या लिखाणात कुठलाही खंड पडू दिला नाही.

शिक्षकाची नोकरी सांभाळून त्यांनी कथा, पटकथा लिहिणे सुरू ठेवले. अनेक उत्तमोत्तम पटकथांचे लेखन त्यांनी केले आणि या पटकथांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांनाच त्यांनी अभिनय करण्याची संधी दिली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ते शाळेच्या वेळा सांभाळून या लघुपटांचे चित्रीकरण करतात. त्यांच्या अनेक लघुपटांना पुरस्कारांनीसुद्धा गौरविण्यात आले आहे. करणसिंह राजपूत आणि अजय पाटील यांच्यासारख्या शिक्षकांमुळेच, या जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा आजही टिकून आहे. पुस्तकी शिक्षणापेक्षा अधिक पटींनी प्रभावी असणारे शिक्षण या शाळांमध्ये दिले जाते. मग, ते लहान-मोठे वैज्ञानिक शोध असोत, पर्यावरणाची वेगळी ओळख करून देणारे प्रकल्प असोत, लोककलांचे विविध कार्यक्रम असोत किंवा मग ‘गुरुजीचा फोन’सारखा मुलांना अभिनय करण्याची संधी मिळवून देणारा लघुपट असो.

निसर्गाच्या कुशीत वाढणार्‍या या मुलांमध्ये कलागुण तसे उपजतच. फक्त गरज असते ती त्या कलागुणांना शोधण्याची, त्यांना आकार देण्याची आणि हे काम फक्त या शाळा आणि या शाळेतील समर्पित शिक्षकच करू शकतात. अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण नसताना, या लहानग्या मुलांनी या लघुपटात काम केले आहे. जर त्यांना प्रशिक्षण आणि संधी मिळाली, तर ते खूप मोठी उंची गाठू शकतात, यात शंकाच नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा, तेथील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे वास्तव मांडणारा हा लघुपट सर्वार्थाने खूप महत्त्वाचा. ही कथा आणि हा लघुपट फक्त ‘वाहोली’ किंवा ‘ठाकराचापाडा’ या मुलांचा नाही; तर देशभरातील सगळ्या मुलांची ही कथा आहे. असे गुरुजी सगळ्या शाळांमध्ये असतील, त्यांच्या फोनवर शाळेत धावत जाणार्‍या मुलांनी शाळा भरू लागल्या आणि या लघुपटासारखे उपक्रम या शाळांमध्ये सातत्याने होत राहिले तर देशाचे भविष्य उज्ज्वलच असणार यात काडीमात्रही शंका नाही.

जिल्हा परिषदेच्या शाळा, या शाळांमधील विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांचे प्रतिनिधित्व हा लघुपट करतो. फार ‘डायलॉग्ज’ नसतानाही हा लघुपट खूप ‘बोलका’ आहे, हे या लघुपटाचे वैशिष्ट्य. ‘न झ डलहेेश्र ठरहपरश्र’ या युट्यूब चॅनलवर हा लघुपट उपलब्ध आहे.


(अधिक माहितीसाठी - शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधायचा असेल किंवा या मुलांना काही मदत करायची असेल, तर त्यांना 8422031680 (अजय पाटील) या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा ‘जिल्हा परिषद शाळा राहनाल, भिवंडी, ठाणे-412302’ या पत्त्यावर भेट देता येईल.)

दिपाली कानसे