सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केलेली वाघनखे आता महाराष्ट्रात दाखल झाली असून ती साताऱ्यात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवार, १९ जुलै रोजी वाघनखांसोबत शिवकालीन इतर शस्त्रास्त्रांच्या ‘शिवशस्त्रशौर्यगाथा’ या प्रदर्शनाचे उद्धाटन करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रदर्शनाचे उद्धाटन पार पडले.
यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच पालकमंत्री शंभूराजे देसाई, श्रीमंत छत्रपती उयदनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर आता शनिवार, २० जुलैपासून हे प्रदर्शन सर्व नगरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन पाहता येईल. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून शिवरायांची वाघनखे भारतात आणणे शक्य झाले आहे.